#CWC22 : द. आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या अडचणीत वाढ!

#CWC22 : द. आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या अडचणीत वाढ!
#CWC22 : द. आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक, भारताच्या अडचणीत वाढ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना खराब हवामनामुळे रद्द झाल्यानंतर मिळालेल्या एका गुणाच्या जोरावर द. आफ्रिकेने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलियानंतरचा तो दुसरा संघ ठरला आहे. (#CWC22)

वेलिंग्टन येथील बेसिल रिझर्व्ह मैदाननवर द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना खेळवला जात होता. विंडिजने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या द. आफ्रिका संघाची सुरुवात खराब झाली. कॅरेबियन संघाने भेदक मारा करत द. आफ्रिकेच्या चार फलंदाजांना अवघ्या ५.३ षटकात २२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर मिग्नॉन डू प्रीझ (३८) आणि मारिजाने केप (५) या जोडीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. (#CWC22)

मात्र, १०.५ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. यावेळी द. आफ्रिकेची धावसंख्या ४ बाद ६१ होती. संततधार पावसामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. अखेर खराब हवामानामुळे मॅच रेफ्रींनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला. या सामन्यानंतर, द. आफ्रिकेने ६ पैकी ४ सामने जिंकून ९ गुणांसह उपांत्य फेरी गाठली. तर वेस्ट इंडिजचा संघ ७ सामन्यांत ३ विजय मिळवून ७ गुणांसह तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. आता भारताला बाद फेरी गाठण्यासाठी द. आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात विजय नोंदवावा लागेल. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून त्यांनी यापूर्वीच सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. (#CWC22)

भारताच्या अडचणी वाढल्या…

भारताने सहातील तीन सामने जिंकले असून त्यांचे ६ गुण आहेत. भारताने पाकिस्तानचा १०७, वेस्ट इंडिजचा १५५ आणि बांगलादेशचा ११० धावांनी पराभव केला आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे.

आता इंग्लंड आणि भारताने त्यांचा पुढचा सामना गमावला तर त्याचा थेट फायदा वेस्ट इंडिजला होणार आहे. भारत सध्या गुणतालिकेत ५ व्या क्रमांकावर आहे. २७ मार्च रोजी खेळला जाणारा सामना भारताने जिंकला तर त्याचे ८ गुण होतील. दुसरीकडे इंग्लंडनेही सामना जिंकला तर त्याचेही ८ गुण होतील आणि त्यानंतर अंतिम ४ मध्ये जाण्याचा निर्णय निव्वळ रनरेटच्या आधारे होईल. (#CWC22)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news