S. Senthilkumar : द्रमुकच्या माफीनाम्यानंतर गोमुत्र वादावर पडदा

S. Senthilkumar : द्रमुकच्या माफीनाम्यानंतर गोमुत्र वादावर पडदा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेमध्ये द्रमुककडून हिंदी भाषिक राज्यांचा गोमुत्र राज्ये असा वादग्रस्त उल्लेख द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिल कुमार यांनी केल्याचे संतप्त पडसाद आज संसदेत आणि संसदेच्या बाहेरही उमटले. भाजपने हा उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या विभाजनाचा द्रमुक, काँग्रेसचा प्रयत्न आहे काय, असा आरोप करताना भाजपने द्रमुकच्या माफीची मागणी केली. अखेरीस द्रमुक नेते टी. आर. बालू यांनी या वक्तव्याची द्रमुक नेते स्टॅलिन यांनी गंभीर दखल घेतल्याचा खुलासा केला. पाठोपाठ सेंथिलकुमार यांनी माफी मागितल्याने या वादावर अखेर पडदा पडला. S. Senthilkumar

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मधील विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना द्रमुक खासदार द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिल कुमार यांनी काल लोकसभेमध्ये या तिन्ही हिंदीभाषिक राज्याना गोमुत्र राज्ये असे म्हटले होते. याआधी द्रमुकचे नेते व मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केल्याचा वाद ताजा होता. त्यापार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने या मुद्द्यावर द्रमुकला आणि यानिमित्ताने कॉंग्रेसलाही लक्ष्य केले. S. Senthilkumar

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस आणि मित्रपक्ष देशाची संस्कृति नष्ट करायला निघाले आहेत, असे टिकास्त्र सोडले. पाठोपाठ लोकसभेमध्ये भाजपच्या खासदारांनी कामकाज सुरू होताच द्रमुक खासदार सेंथिल कुमार तसेच द्रमुक नेते टी. आर. बालू यांच्या माफीनाम्याची मागणी करताना जोरदार घोषणाबाजी केली. तर, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील द्रमुकला घेरण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसले. द्रमुक आणि काँग्रेसचा हा उत्तर भारत –दक्षिण भारत असे विभाजन घडविण्याचा प्रयत्न आहे काय, असा हल्लाबोल या मंत्र्यांनी केला. यावरून प्रश्नोत्तराच्या तासात झालेल्या गदराळोमुळे लोकभाध्यक्ष ओम बिर्ला यांना कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

दुपारी बाराला पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शून्य काळात टी. आर. बालू यांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सेंथिल कुमार यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे सांगताना बालू यांनी खासदार सेंथिल कुमार यांना सभागृहाची माफी मागण्यास सांगितले. अखेरीस, सेंथिल कुमार यांनी अनवधानाने वादग्रस्त वक्तव्य केल्याचे म्हणत माफी मागितली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news