नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 12 जानेवारीला एका कार्यक्रमाला येणार आहेत. या वेळी ते शेरकरांना जुन्नरच्या उमेदवारीचे गिफ्ट देणार का? याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. शेरकरांची उमेदवारी जाहीर करून पवार जुन्नरचा तिढा कायमचा सोडवतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
जुन्नर तालुक्यात पवार तीन महिन्यांत दुसर्यांदा येत आहेत. गेल्या वेळेप्रमाणेच याही वेळी ते काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांच्याच निवासस्थानी येणार आहेत. यामध्ये बराच अर्थ दडलेला आहे. महाविकास आघाडीचे जुन्नर विधानसभेचे उमेदवार सत्यशील शेरकर असू शकतात. जुन्नरची जागा जरी राष्ट्रवादी काँग्रेसची असली तरी कदाचित शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन शरद पवार अतुल बेनकेंच्या विरोधात तगडा उमेदवार देऊ शकतात, अशी चर्चा होऊ लागली आहे.
जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्यशील शेरकर व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर वाढलेली जवळीक म्हणजे 2024 जुन्नरच्या विधानसभेची उमेदवारी सत्यशील शेरकर यांना शरद पवार यांच्याकडून मिळू शकते का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी किल्ल्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता. या मोर्चामध्ये जुन्नरचे आमदार सहभागी झालेले नाहीत. मात्र, या मोर्चात सत्यशील शेरकर शिवनेरी किल्ल्यापासून सहभागी झाले होते.
जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके अद्यापही तटस्थ आहेत. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर अशी तटस्थ भूमिका घेणारे ते एकमेव आमदार आहेत. ते तटस्थ असले तरी त्यांचा कल अजित पवार यांच्या बाजूने दिसत आहे. बेनके अजित पवारांच्या गटासोबत जाणार, हे सांगण्यासाठी आता भविष्यकाराची गरज उरलेली नाही. शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याच्या नजरेतून हे सुटणे शक्य नसल्याने 12 जानेवारीला मोठी घोषणा होऊ शकते, असा कयास आहे.
हेही वाचा :