‘पद्म’साठी अभिनेते अशोक सराफ यांची शिफारस करणार

‘पद्म’साठी अभिनेते अशोक सराफ यांची शिफारस करणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येईल,' अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिली. 'अशोक सराफ यांनी अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला, त्यांना विनोदाचा बादशहा म्हटले जाते. लोकांच्या हृदयावर राज्य करणे महाकठीण काम असते, ते अशोक सराफ यांनी केले आहे, अजूनही करत आहेत,' असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रनाथ घाटे, अभिषेक जाधव आदी उपस्थित होते. श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती प्रसाद तारे यांना देण्यात आली.

मुनगंटीवार म्हणाले, आज बाबासाहेब पुरंदरे जरी नसले, तरी प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य पोहोचविण्याचे कार्य करणे ही त्यांना आदरांजली ठरेल. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणार्‍या 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल.

सराफ म्हणाले, कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारे प्रेक्षकांचे पाठबळ महत्त्वाचे आहे, याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असे पाठबळ महाराष्ट्राच्या रसिकांनी दिले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'जाणता राजा'च्या रूपाने उभ्या केलेल्या नाट्यशिल्पाला तोड नाही. या नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज देऊन या नाटकाशी जोडले गेलो. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने बाबासाहेबांना मी आपल्या घरात घेऊन जातो आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news