नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि.१) गोपनीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राज्यसभा निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे समजते. भाजपकडे असलेल्या संख्याबळावर भाजप तीन जागा जिंकणार हे निश्चित आहे. मात्र, आता भाजप चौथ्या जागेवर निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागा रिक्त होत आहेत. त्यामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरण आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि काँग्रेसचे कुमार केतकर यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसचा एक उमेदवार जिंकून येऊ शकतो. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार जिंकून येऊ शकतो. भाजपचे तीन उमेदवार जिंकून येऊ शकतात. मात्र भाजप मित्रपक्षांची मते मिळवून चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यातच ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत. तसे संकेतही विरोधी पक्षातील नेत्यांकडून मिळत आहेत. भाजप मात्र गेल्या निवडणुकीत जिंकल्याप्रमाणे आणखी एक अतिरिक्त जागा काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र भाजपने चौथी जागा जिंकल्यास त्याचा फटका कोणाला बसेल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होऊ शकेल.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंकडे सर्वात जास्त असलेले आमदार तसेच अजित पवार गटाचे संख्याबळ लक्षात घेवून त्यांची अतिरीक्त मते आणि इतर असंतुष्टांच्या मतांच्या जोरावर चौथी जागा जिंकता येईल, असा भाजपचा होरा आहे.
हेही वाचा :