पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनवर (Ukraine) हल्ला सुरू केल्यानंतर संपूर्ण जगभराचे लक्ष युक्रेनवर केंद्रीत झाले आहे. युरोपमधील युक्रेन हा रशियानंतर दुसरा महत्त्वाचा देश आहे. कीव राजधानी असलेल्या युक्रेनचे क्षेत्रफळ ६,०७,७०० वर्ग किमी इतके आहे. युक्रेनी अधिकृत भाषा असली तरी रशियन भाषाही येथे बोलली जाते. सुमारे सव्वा चार कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत. परिणामी जगभरासह भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनला पसंती देतात. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीही हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये (Ukraine) येत असतात. यामागे कोणते कारण आहे, याबाबत घेतलेला आढावा…
भारतातील जवळपास २० हजार विद्यार्थी (MBBS Student) युक्रेनमध्ये (Ukraine) एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात कारण तिथल्या शिक्षणाचे काही वेगळी वैशिष्ट्य आहेत. तसेच तेथील शैक्षणिक शुल्क प्रमुख कारण आहे. येथील खासगी महाविद्यालयाची एमबीबीएसची फी भारतातील महाविद्यालयाच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या देशात हा खर्च १ ते ८ कोटींच्या घरात जातो. परंतु, युक्रेनमध्ये कोणत्याही महाविद्यालयातून एमबीबीएसची (MBBS) पदवी केवळ २५ लाखांत घेता येते. त्यामुळे अनेक देशातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस करण्यासाठी जातात.
भारतात दरवर्षी केवळ ८८ हजार एमबीबीएसच्या (MBBS) जागा उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. दरवर्षी जवळपास ८ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी केवळ ८८ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते. तर यापैकीच काही विद्यार्थी युक्रेनसारख्या (Ukraine) देशात शिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात.
युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण स्वस्त असले. तरी तेथील शिक्षण दर्जेदार आहे. तसेच येथील अभ्यासक्रमाला जागतिक मान्यता आहे. भारतात युक्रेनमध्ये घेतलेल्या एमबीबीएसच्या पदवीला मान्यता आहे. भारतात फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीची हमखास संधी मिळते. जापोरिज्जिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, नॅशनल पिरोगोव मेमोरियल युनिव्हर्सिटी, इवानो- फ्रैंकिव्स्क नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी या विद्यापिठांचा सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये समावेश आहे.
युक्रेनमधील विद्यापीठात प्रॅक्टिकल अध्यापनावर भर दिला जातो. तसेच पायाभूत सुविधादेखील उत्कृष्ट आहेत. त्यामुळेच भारतातील मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक यासह इतर राज्यांतील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात असतात.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी सहा वर्षांचा आहे. पीसीबी विषयासह १२ वीत ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण आणि नीट स्कोअरकार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी ३५०० ते ५००० इतकी अमेरिकन डॉलर फी असते.
हेही वाचलंत का ?