Vijayapriya Nithyananda : कोण आहे ‘कैलासा’ची विजयप्रिया नित्यानंद? UN मध्ये ओकली भारताविरुद्ध गरळ

Vijayapriya Nithyananda : कोण आहे ‘कैलासा’ची विजयप्रिया नित्यानंद? UN मध्ये ओकली भारताविरुद्ध गरळ

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला वादग्रस्त स्वयंभू धर्मगुरु नित्यानंद याने स्थापन केलेला तथाकथित देश 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा (यूएसके)' (The United States of KAILASA) चे प्रतिनिधी गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी झाले होते. या सहभागाने भारतातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या शिष्टमंडळातील सर्व सदस्य महिला होत्या. नित्यानंद याच्या ट्विटर अकाऊंटवर शिष्टमंडळाची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. शिष्टमंडळात विजयप्रिया नित्यानंद (Vijayapriya Nithyananda) हिचाही समावेश होता. विजयप्रिया नित्यानंद ही महिला कैलासाची कायमस्वरुपीची राजदूत म्हणून जीनिव्हा येथील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क समितीच्या बैठकीत सहभागी झाली होती.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समितीने आयोजित केलेल्या चर्चेदरम्यान विजयप्रियाने 'हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु' संरक्षण मिळावी अशी मागणी केली. नित्यानंद यांचा त्यांची जन्मभूमी असेलेल्या भारताने छळ केला तसेच त्यांच्यावर देशात बंदी घातली आहे, अशी तक्रार तीने यावेळी केली. (Vijayapriya Nithyananda)

विजयप्रिया नित्यानंद कोण आहेत? (Vijayapriya Nithyananda)

साडी आणि पगडी घातलेल्या व दागिन्यांनी मडलेल्या या महिलेने UN च्या बैठकीत स्वतःची ओळख " कैलासाची कायमस्वरूपी राजदूत" म्हणून करून दिली. तिच्या फेसबुक प्रोफाइलनुसार ती वॉशिंग्टनमध्ये राहते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या तिच्या फोटोंमध्ये विजयप्रियाच्या उजव्या हातावर नित्यानंदचा एक मोठा टॅटू पाहण्यास मिळतो.

विजयप्रियाच्या लिंक्डइन प्रोफाईल नुसार, तिने मॅनिटोबा विद्यापिठातून मायक्रोबायोलॉजी मधून पदवी घेतली आहे. या प्रोफाईलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की विजयप्रियाला इंग्रजी, फ्रेंच, हिंदी, क्रियोल आणि पिजीन भाषांची ज्ञान आहे.

'कैलासा'ची एक वेबसाईटही आहे, ज्यामध्ये विजयप्रिया नित्यानंद आपल्या देशाच्या वतीने संघटनांशी करार करते असा उल्लेख आहे. २४ फेब्रुवारी रोजी, संयुक्त राष्ट्रांसंघाच्या बैठकीत, ते अनेक देशांच्या प्रतिनिधींना भेटले आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. इतर अनेक छायाचित्रांमध्ये विजयप्रिया काही अधिकार्‍यांसोबत करारावर स्वाक्षरी करताना दिसत आहे. त्यांच्या मते ज्या लोकांनी करारावर स्वाक्षरी केली ते अमेरिकन होते. 'कैलासा'च्या वेबसाईटनेही असा दावा केला आहे की, त्यांचे 150 देशांमध्ये दूतावास आणि एनजीओ आहेत.

यावर संयुक्त राष्ट्रसंघ काय म्हणाले 

या काल्पनिक देशाच्या प्रतिनिधींनी केलेल्या विधानांकडे ते दुर्लक्ष करतील असे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याने सांगितले. युएनचे असेही म्हणणे आहे की ज्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे त्याबद्दल त्यांचे विचार "अप्रासंगिक" आणि "वरवरचे" आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत 'कैलासा'च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीने भारतासह जगालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारत सरकारने अद्याप या प्रकरणी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

'कैलासा' कुठे आहे?

नित्यानंद याने काही वर्षांपूर्वी भारत सोडला होता. त्याच्यावर भारतात बलात्कार आणि लैंगिक छळासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

भारत सोडल्यानंतर नित्यानंदने २०१९ मध्ये इक्वेडोरच्या किनार्‍यावरील एका बेटावर 'कैलासा'ची स्थापना केली. हिमालयातील शिवशंकराच्या निवासस्थानावरून त्याने आपल्या देशाचे नाव कैलासा ठेवले आहे. इक्वेडोरने त्यावेळी नित्यानंद त्यांच्या देशात असल्याचे नाकारले होते. त्याचे प्रवचन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले जातात. स्वयंघोषीत धर्मगुरु २०१९ पासून सार्वजनिक ठिकाणी कोठेही दिलेला नाही.


अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news