Virat Kohli Flop Show : विराट कोहलीच्या ‘फ्लॉप शो’वर चाहते भडकले, म्हणाले; ‘रन मशिनच्या सुवर्ण युगाचा अंत!’

Virat Kohli Flop Show : विराट कोहलीच्या ‘फ्लॉप शो’वर चाहते भडकले, म्हणाले; ‘रन मशिनच्या सुवर्ण युगाचा अंत!’
Published on
Updated on

पुढरी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Flop Show : टीम इंडियाचा रन मशिन विराट कोहलीची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या पाच डावांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 111 धावा आल्या आहेत. मार्च 2022 पासून त्याला कसोटीत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याने शेवटचे अर्धशतक जानेवारी 2022 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध केले होते. कर्णधार म्हणून ती त्याची शेवटची कसोटी होती. कर्णधारपद सोडल्यापासून विराटच्या बॅटने एकही अर्धशतक झळकावलेले नाही.

कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 13 डावांनंतर 24 जानेवारी 2012 रोजी अॅडलेड कसोटीत पहिले कसोटी शतक झळकावले. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढील सात वर्षांत म्हणजे 22 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्याने आणखी 26 शतके झळकावली. आता गेल्या 41 डावांमध्ये कोहलीच्या बॅटमधून एकही कसोटी शतक झळकलेले नाही.

किंग कोहलीचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे रेकॉर्ड शानदार राहिले आहे. त्याने कांगारूंविरुद्ध 23 सामन्यांच्या 41 डावांमध्ये सात शतके आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने 1794 धावा फटकावल्या आहेत. असे असूनही यावेळी तो एका धावेसाठी सुद्धा संघर्ष करताना दिसत आहे. कारकिर्दीतील पहिले 13 आणि शेवटचे 41 डाव एकत्रीत केल्यास 54 डावांचा असा टप्पा आहे जिथे कोहलीने एकही शतक झळकावलेले नाही. इंदूर कसोटीपर्यंत कोहलीने आपल्या कारकिर्दीत 182 डाव खेळले आहेत.

अर्धशतकासाठीही धडपड

अशातच 54 डावांना त्यातून वगळल्यास कोहली 128 डावांमध्ये 27 शतके झळकावली आहेत. हा तो काळ होता ज्यात कोहलीने क्रिकेट जगतावर वर्चस्व गाजवले. साधारणपणे प्रत्येक 5व्या डावानंतर कोहलीच्या बॅटमधून एक कसोटी शतक येत होते आणि आता परिस्थिती अशी आहे की त्याला शतक काय पण अर्धशतक पूर्ण करण्यासही धडपडावे लागत आहे. त्यामुळे त्याचा सुवर्णकाळ संपुष्टात आला आहे का? असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. कोहलीची आकडेवारी ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. सोशल मीडियावर चाहते कोहलीला त्याच्या कामगिरीबद्दल ट्रोल करत आहेत. राहुलप्रमाणे कोहलीलाही संघातून वगळले पाहिजे, असे काहींचे मत आहे. (Virat Kohli Flop Show)

नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक

विराट कोहलीने गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकून तीन वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. ते त्याचे टी-20 तील पहिले शतक ठरले होते. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 डावांमध्ये 3 शतके झळकावली. पण चाहते अजूनही कसोटीत त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. त्यानंतर कसोटीत त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही. (Virat Kohli Flop Show)

5 व्यांदा फिरकी विरुद्ध बाद

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कोहली 5 व्यांदा फिरकीपटूंविरुद्ध बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू टॉड मर्फीने त्याला तीनदा, तर मॅथ्यू कुहनमनने दोनदा आपला बळी बनवले. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी सध्या सुरू असलेल्या मालिकेत पदार्पण केले आहे. तीन कसोटी सामन्यांमध्येही त्याला धावा काढता आलेल्या नाहीत. नागपूर कसोटीत 12, दिल्ली कसोटीच्या पहिल्या आणि दुस-या डावात अनुक्रमे 44 आणि 20 धावा तर इंदूर कसोटीच्या पहिल्या आणि दुस-या डावात त्याला अनुक्रमे केवळ 13 आणि 22 धावा करता आल्या आहेत.

2019 पासून शतकाची प्रतिक्षा

कोहलीने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. 2011 ते 2019 पर्यंत त्याने केवळ 84 सामन्यांमध्ये 54.97 च्या सरासरीने 7202 धावा केल्या. नोव्हेंबर 2019 पासून त्याची फलंदाजी घसरायला लागली. तेव्हापासून विराटने 23 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 25.7 च्या सरासरीने केवळ 1028 धावा करू शकला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकही शतक झळकले नाही.

कोहलीची क्रमवारीत घसरण

या फ्लॉप कामगिरीचा परिणाम त्याच्या मानांकनावरही दिसून येत आहे. सध्या कसोटी क्रमवारीत कोहलीही टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. त्याची 665 रेटिंगसह 17 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news