बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने १० ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केला. पण, याचदिवशी तिने एक मोठी बातमी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काही दिली. रकुल प्रीतने फॅन्सना एक खास सरप्राईज दिलं. सामान्यत: आपल्या खासगी आयुष्यावर फारशी न बोलणाऱ्या रुकुलने मात्र थेट आपल्या बॉयफ्रेंडविषयी खुलासा केलाय. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता जॅकी भगनानीविषयी (Jackky Bhagnani) पोस्ट लिहिली आहे. रकुल प्रीतचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानी कोण आहे? (Jackky Bhagnani) तिने आतापर्यंत ही गोष्ट सर्वांपासून का लपवून ठेवली. मग, आताचं का तिने आपल्या बॉयफ्रेंडविषयी खुलासा केला आहे? तर मग, पाहुया रकुल जॅकी भगनानी विषयी काय म्हणते?
रकुल प्रीत सिंहने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघे हातात हात घालून गुफ्तगू करताना दिसताहेत. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. रकुलने फोटो शेअर करत लिहिलयं की-
'थँक्यू माय लव्ह. यावर्षी तू माझ्यासाठी मोठे गिफ्ट होऊन आलाय. माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी आपले धन्यवाद. मला नेहमी हसवण्यासाठीही धन्यवाद. सोबत आठवणी साठवू.' हाच फोटो त्यानेही त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
कोण आहे भगनानी?
भगनानीचा जन्म २५ डिसेंबर, १९८४ रोजी कोलकातामध्ये झाला. त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो चित्रपट निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे.
त्याने शालेय शिक्षण सेंट टेरेसा स्कूलमधून केले. सेटवर त्याने आपल्या वडिलांसोबत काम करम्यास सुरुवात केली होती. पुढे त्याने कॉमर्समध्ये पदवी घेण्यासाठी हस्सराम रिझुमल कॉलेज ऑफ़ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, मुंबईमध्ये प्रवेश घेतला. त्याने स्ट्रासबर्ग थिएटर आणि न्यूयॉर्कमधील फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.
त्याने तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट मोहिनीमधून डेब्यू केलं होतं. यामध्ये अभिनेत्री त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत होती.
काही महिन्यांपूर्वी भगनानीसह मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील ९ दिग्गजांवर छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मॉडेलच्या तक्रारीनंतर एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यावेळी भगनानी परदेशात होता. भगनानी विरोधात आरोप करत मॉडेलने म्हटले होते की, बांद्रामध्ये तिचे शोषण केले होते.
त्याने २००१ मध्ये 'कल किसने देखा' या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. मित्रों, यंगीस्तान, वेलकम २ कराची, बेल बॉटम, F.A.L.T.U, अजब गजब लव्ह, मोहिनी, कुली, रंगरेज यासारख्या हिंदी चित्रपटामध्ये त्याने काम केलंय. 'यंगिस्तान' या चित्रपटातील भगनानी आणि नेहा शर्मावर चित्रीत करण्यात आलेले 'सुनो ना संगे मरमर' हे गाणे मात्र खूप लोकप्रिय ठरले. अरिजीत सिंहच्या टॉप गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश आहे.
उत्तम शरीरयष्टी आणि दिसायला सुंदर असूनही फारसा चांगला अभिनय न जमल्यामुळे प्रेक्षकांनी त्याला नाकारलं. कारण, त्याचे चित्रपट म्हणावे तसे चालले नाहीत. त्यामुळेचं त्याने संगीत क्षेत्रात नशीब आजमावलं. मुंबईमध्ये एका कार्यक्रमावेळी त्याने स्वत: आपले म्युझिक लेबल 'जस्ट म्युझिक' लॉन्च केलं होतं. २०१९ मध्ये त्याचा एक म्युझिक व्हिडिओदेखील रिलीज झाला होता.
करिअरपेक्षा अधिक तो आपल्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत राहिला आहे. भगनानी आणि भूमी पेडणेकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला नाही. दोघेही एकत्र कधीचं स्पॉट झाले नाहीत.
असं म्हटलं जातं की, भूमीच्या आधी त्याने अभिनेत्री नेहा शर्मासोबत लॉन्ग डेटींग केलं आहे.