नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महायुतीमध्ये असणारे शिवसेनेतील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून उद्धव ठाकरे गटात जाणार नाहीत असे सांगून भाजपने रामटेक मतदारसंघातील सस्पेन्स वाढविला आहे. नागपूर जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांच्या तिकिटावरून अनिश्चितता आणि भाजपाची दावेदारी उघडपणे व्यक्त होत असताना काँग्रेसचे आमदार राजू पारवे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दोनदा खासदार राहिलेले तुमाने यांना आपल्याला पुन्हा तिकीट मिळणार असा विश्वास आहे. भाजपला हा मतदारसंघ आपल्याकडे हवा आहे. यातून भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे, काँग्रेस आमदार राजू पारवे, जिल्हा भाजप अध्यक्ष अरविंद गजभिये अशी इच्छुकांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार पारवे यांच्या भेटीबाबत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार राजू पारवे डीपीडीसी अंतर्गत असलेल्या प्रस्तावांच्या संदर्भात भेटले. पारवे यांनी मलाही फोन केला होता असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला. भाजपाने २० जागा जाहीर केल्या आहेत. ज्या जागांवर एकमत झाले आहे, त्या जागा घोषित करण्याची सहकारी पक्षांना मुभा आहे. महायुतीचे तिन्ही नेते एकत्र येतील व लवकरच उर्वरित जागांवर एकमत होईल.
विदर्भातील नागपूर, वर्धा,अकोला, चंद्रपूर असे 4 उमेदवार भाजपने जाहीर केले असून रामटेक, वाशिम यवतमाळ या शिवसेनेच्या जागा आहेत. यावेळी भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जागा भाजपाच्याच आहेत असा दावा बावनकुळे यांनी केला. दरम्यान, संघ प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 16 मार्चला सायंकाळी नागपूरला येणार असल्याने या दौऱ्यांत चर्चेअंती या जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :