सोलापूर : दुष्काळ व पाणीटंचाई निवारणार्थ १० कोटी ७९ लाखाचा निधी मंजूर

सोलापूर : दुष्काळ व पाणीटंचाई निवारणार्थ १० कोटी ७९ लाखाचा निधी मंजूर

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दुष्काळाच्या व पाणीटंचाईच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील पाणीटंचाई निवारणार्थ एकूण १० कोटी ७९ लाख रुपये निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून सन २०२३-२४ या वर्षात सोलापूर महानगरपालिका व १७ नगरपालिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ५ कोटी १७ लाख रुपये निधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना व ५ कोटी ६२ लाख रुपये निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत मंजूर झाला आहे.

महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत ४ कोटी ८४ लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत १ कोटी ६९ लाख रुपये तसेच जिल्ह्यातील १७ नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३३ लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत ३ कोटी ९३ लाख मंजूर करण्यात आले आहेत.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सोलापूर महानगर पालिकेकडून पाणी टंचाई निवाणार्थ मंजूर कामे झाली असून शहरातील विविध भागात व नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, नवीन पाईपलाईन टाकणे, सब मर्सिबल मोटर पंप बसविणे, बोअर घेणे, सोलार पंप बसविणे, नवीन हौद बांधणे आदी कामे करण्यात आली आहेत. अकलुज, श्रीपूर, माढा नगरपंचायत क्षेत्रात विविध भागात मोटार पंप बसविणे, नवीन हौद बांधणे व पाईप लाईन करणे आदी कामे करण्यासाठी ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या तरदूत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत पाणी टंचाई निवाणार्थ महापालिका व नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, बोअरवेल घेणे, विद्युत मोटार पंप बसविणे, दुबार पंपिंग करणे, करमाळा शहरास पाणी पुरवठा करणा-या दहीगाव येथील जकवेल येथील गाळ काढणे व चारी मारणे, वैराग नगरपंचायत हद्दीतील पाणी टंचाई निवारणार्थ शहरातील अस्तित्वातील विहिरींमधील गाळ काढून सबमर्सिबल पंप बसवणे.

तसेच टँकर भाडेतत्वावर घेवून शहरामध्ये पाणी पुरवठा, विहिरी अधिग्रहण करणे, अक्कलकोट शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ कुरनूर धरणामध्ये स्त्रोत बळकटीकरण करणे, मोहोळ शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ दोन ठिकाणी विंधण विहिरी घेवून विद्युत पंप बसविणे, पंढरपूर येथील ६५ एकर येथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणे व मलनि:स्सारण व्यवस्था करणे या कामांसाठी ३ कोटी ९३ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news