गरीब देशातील नागरिकांना देण्यात येणारा कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुलनेत जगभरातील श्रीमंत देशांमधील नागरिकांना सहापट अधिक कोरोना बुस्टर डोस देण्यात येत आहेत. हा प्रचंड असा असमतोल असून मोठा घोटाळाच आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी व्यक्त केले आहे. कोरोना प्रतिबंधक डोसच्या वाटपातील असमतोल तत्काळ थांबावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
श्रीमंत देशांनी कोरोना लसीचा साठा केला आहे. यामुळेच अनेक गरीब देशांमधील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही, असेही डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.
ऑगस्ट महिन्यातही डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी जगभरातील श्रीमंत देशांमध्ये देण्यात येणार्या बुस्टर डोस बंद करण्यात यावेत, असे आवाहन केले होते. तसेच डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वच देशांनी बुस्टर डोस बंद करावेत, गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटलं होते. यानंतरही जर्मनी, इस्त्रायल, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये बुस्टर डोस देण्याचे कार्यक्रम सुरुच राहिले.
दररोज तब्बल ६९ लाखांहून अधिक बुस्टर डोस आता 'डब्ल्यूएचओ'ने ई-मेलच्या माध्यामतून दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, जगातील ९२ देशांनी कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस नागरिकांना दिल्याचे म्हटलं आहे. यामध्ये एकही कमी उत्पन्न गटातील देश नाही. मीडिया रिर्पोटनुसार, जगभरात दररोज २.८५ कोटी कोरोना प्रतिबंधक डोस दिले जात आहेत. तर तब्बल ६९ लाखांहून अधिक बुस्टर डोस देण्यात येत आहे. गरीब देशांमध्ये दररोज केवळ ११ लाखांहून कमी लस देण्यात येत आहेत.
सुमारे दोन वर्षांनंतर पश्चिम युरोपमधील जर्मनी आणि ब्रिटन या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ही चिंताजनक बाब आहे. कारण युरोपमध्ये कोरोना प्रतिंबधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पश्चिम युरोपमधील सर्वच देशांमधील लसीकरणाची टक्केवारी ही ६० टक्क्यांहून अधिक आहे. तरीही वाढत्या रुग्णसंख्येमुळे युरोपमधील काही देशात पुन्हा लॉकडाउनची लागू केले आहे. युरोपमध्ये मागील काही आठवड्यांपासू कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.