Weather Forecast | राज्यातील अनेक भागांत धुवाँधार कायम, कोकणसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Forecast | राज्यातील अनेक भागांत धुवाँधार कायम, कोकणसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : Weather Forecast पुढील ३-४ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्रावर एक चक्रवाती परिवलन कमी उष्णकटिबंधीय पातळीत आहे आणि पुढील २-३ दिवसांत ते पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रासह, कोकण, गोवा आणि राज्यातील इतर भागांत पाऊस पडत आहे. दरम्यान, आज गुरुवार (दि.१३) हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर आणि विदर्भासाठी यलो अलर्ट दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचे धुमशान सुरु आहे. यामुळे नदी, नाले भरून वाहत आहेत. सध्या खरीप पिकांची कापणी सुरु आहे. पण पावसामुळे शेतीची कामे थांबली असून अनेक ठिकाणी भात, सोयाबिन पिकांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेत मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सोलापुरातील माढा भागाला मुसळधार पावसाने झोडपले आहे.

नाशिक जिल्ह्यात धुमशान, मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, द्राक्ष पिकांना फटका

नवरात्र संपून आठ दिवसावर दिवाळी आलेली असतानादेखील पावसाळा संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसून येत नाही आहे. पावसाळ्यात बरसावा तसा मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कोसळत आहे. त्यामुळे मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, आणि महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष या सर्वच पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसतो आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात परतीच्या पावसाने जोर धरल्याने चासकमान धरण पुन्हा १०० टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास कुठल्याही क्षणी धरणाच्या सांडव्याद्वारे भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हातकणंगले- इचलकरंजी संपर्क तुटला

हातकणंगले तालुक्यात दोन दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्याचा प्रचंड वेग वाढल्यामुळे अस्ताव्यस्तपणे खोदून ठेवलेल्या भुयारी मार्गात आठ ते दहा फूट पाणी साचले. त्यामुळे इचलकरंजीशी हातकणंगलेचा संपर्क तुटला. पर्याय म्हणून तहसील कार्यालयापासून गेलेल्या रेल्वे भुयारी मार्गातही दुपारी चारनंतर पाणी आल्यामुळे तो मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. इचलकरंजीहून येणार्‍या आणि इचलकरंजीकडे जाणार्‍या पुणे, मुंबई, पेठवडगावसह परिसरातील प्रवाशांची मोठी कुचंबणा झाली. भरपावसात त्यांना रात्र काढण्याची वेळ आली. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका सेवाही थांबल्यामुळे रुग्णांचेही हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाविरुद्ध प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस जोरात

देशभरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. विशेषतः उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने लोक त्रस्त झाले आहेत. मान्सूनचा हंगाम संपल्यानंतरही काही भाग वगळता देशात पाऊस सुरूच आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्येही इतका पाऊस का पडतो आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.

भारतात नैऋत्य मोसमी वार्‍यांमुळे पाऊस पडतो. हा मान्सून साधारणपणे ऑगस्टपर्यंत पूर्णपणे देश व्यापतो आणि साधारणतः सप्टेंबरच्या मध्यापासून त्याच्या परतीचा प्रवासही सुरू होतो. राजस्थानमधून मान्सून परतीची तारीख 17 सप्टेंबरपासून सांगितली जाते. या कालावधीत पाऊस संपल्यानंतर आर्द्रतेत घट नोंदवली जाते आणि देशाच्या वायव्य भागांमध्ये हळूहळू पाऊस कमी होत जातो. सर्वसाधारणपणे संपूर्ण भारतात मान्सूनची माघार 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होते व या वेळेत देशातील पावसाळा संपतो. मात्र, यंदा ऑक्टोबरमध्येही पाऊस जोरात सुरू आहे. (Weather Forecast)

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news