इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस | पुढारी

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, शेती पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील निमसाखर, शिरसटवाडी, रणगाव, अंथूर्णे, भरणेवाडी, वालचंदनगर व कळंब परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या परिसरात मान्सूनचा सुरवातीचा पाऊस जेमतेम झाला होता. मात्र, परतीच्या पावसाने या भागात पाणीच पाणी झाले आहे.

त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या पिकात पाणी साचून राहिले असून, जर पाऊस थांबला नाही तर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. 11) परिसरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मंगळवारी वालचंदनगर व अंथुर्णे परिसरात 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर बुधवारी (दि. 12) रोजी सकाळपासूनच परिसरात सातत्याने कमी-जास्त स्वरूपात पाऊस पडत आहे. दिवसभर सुरू असलेल्या या पावसाने इंदापूरकरांना कोकणात असल्याचा भास जाणवत होता.

निमगाव केतकीला सर्वाधिक पावसाची नोंद
मंगळवारी तालुक्यातील निमगाव केतकी येथे 55 मिमी, काटी येथे 33 मिमी, लोणी देवकर येथे 3 मिमी, सणसर येथे 23 मिमी, बावडा येथे 6 मिमी, भिगवण येथे 7 मिमी, इंदापूर येथे 15.8 मि.मी., तर अंथुर्णे येथे 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

Back to top button