पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढचे २ ते ३ दिवस राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (Weather Forecast)
पुढे होसाळीकर यांनी म्हटले आहे की, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वाऱ्याच्या वेग ताशी 30-४० किमी असण्याची शक्यता आहे. तर उद्या (दि.२९) काही तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यतादेखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Weather Forecast)
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच असून, पुढील दोन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, विदर्भात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच, 2 मार्चपर्यंत सातारा, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या पाच दिवसांपासून कोकण वगळता सर्वच भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात मात्र अवकाळी पावसासह काही भागांत गारपीट होत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भातील काही भागांत सलग गारपीट होत आहे. या गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय, नाशिक भागातील द्राक्षपिकास प्रचंड तडाखा बसला आहे. गेल्या चोवीस तासांत मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट झाली आहे.
हेही वाचा: