पुणे : पुढारी वृत्तसेवा : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस; तर विदर्भात मात्र गारपीट तसेच वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाच दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. दरम्यान गेल्या चोवीस तासांत विदर्भातील बहुतांश भागांत गारांचा पाऊस तर मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. राज्यात कोकण वगळता उर्वरित भागांत गेल्या पाच दिवसांपासून वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.
मध्य-पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश तसेच ईशान्य अरबी समुद्र ते पश्चिम राजस्थानपर्यंत गुजरात पार करून द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. याबरोबरच कर्नाटकच्या अंतर्गत भागापासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कोकण पार करून आणखी एक द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून विदर्भात गारपीट, तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दोन्ही स्थितीची तीव्रता कायम असून, यामुळे पुढील पाच दिवस विदर्भात गारपीट आणि उर्वरित भागांत (कोकण वगळता) अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
हेही वाचा