पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे. लक्ष्मण हे अगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक काम पाहणार आहेत. तर भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू हृषिकेश कानिटकर हे भारतीय महिला क्रिकेट संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक असतील. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ शहरात या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मण व्यतिरिक्त, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारताचे माजी लेग-स्पिनर साईराज बहुतुले गोलंदाजी प्रशिक्षक आणि मुनीष बाली क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही.
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. तर महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. मात्र, बांगलादेशमध्ये केलेल्या वर्तनामुळे तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे हरमनप्रीत सुरुवातीचे सामने खेळताना दिसणार नाहीत.
ऋतुराजने आतापर्यंत 2 वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 27 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 212 धावा केल्या. संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. रिंकू सिंह, प्रभसिमरन सिंह आणि जीतेश शर्मासारखे स्टार खेळाडू भारतीय स्क्वॉडचा भाग आहेत. या तीनही खेळाडूंनी आयपीएलमध्ये तुफान कामगिरी केली होती.
भारतीय महिला संघासाठी, नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती डिसेंबरमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय देशांतर्गत हंगाम सुरू होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे, असे वृत्त समोर आले आहे. 2 कसोटी आणि 34 एकदिवसीय सामने खेळलेल्या कानिटकर, फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाच्या प्रभारी होते. कानिटकर व्यतिरिक्त, राजीव दत्ता (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि सुभदीप घोष (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) हे महिला संघाच्या सपोर्ट स्टाफचे इतर सदस्य असतील.
संघात अनुभवी फलंदाज शिखर धवनला जागा देण्यात आलेली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन 23 सप्टेंबर 2023 ते 8 ऑक्टोबरपर्यंत चीनच्या हांग्जोमध्ये केलं जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकासोबत आशियाई खेळांच्या तारखा (ऑक्टोबर 5 – नोव्हेंबर 19), पुरुषांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय संघ निवडला गेला आहे.
आशियाई खेळांमध्ये तिसऱ्यांदा क्रिकेट खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत पहिल्यांदाच आपला क्रिकेट संघ आशियाई खेळांसाठी पाठवत आहे. बीसीसीआयने याआधी कधीही पुरुष किंवा महिला संघाला पाठवण्यात आले नव्हते.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, यशस्वी जैसवाल, अर्शदीप सिंह, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, जितेश शर्मा, शाहबाज अहमद, आवेश खान, मुकेश कुमार, शिवम मावी, प्रभसिमरन सिंह, मुकेश कुमार, रवी बिश्नोई