Voice Cloning Fraud : एआयच्या ‘व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड’ची धास्ती, हुबेहूब आवाज काढून होतेय पैशांची मागणी

Voice Cloning Fraud : एआयच्या ‘व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड’ची धास्ती, हुबेहूब आवाज काढून होतेय पैशांची मागणी
Published on
Updated on

एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानाने हुबेहूब चेहरा तयार केला जात असल्याची बाब सर्वांनाच कळून चुकली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाने हुबेहूब 'आवाज' काढणेही शक्य आहे. एआयचे हे भन्नाट टूल चांगले की वाईट यावर मतभिन्नता असली तरी, सायबर ठगांच्या मात्र ते चांगलेच पथ्यावर पडले आहे. होय, सध्या 'व्हाॅइस क्लोनिंग फ्रॉड'ची (Voice Cloning Fraud) अनेकांमध्ये धास्ती असून, कित्येकांना व्हाॅइस क्लोनिंगच्या माध्यमातून गंडविल्याचे समोर येत आहे.

ऑनलाइन फसवणूक ही बाब काही नवी नाही. मात्र, सायबर ठग फसवणुकीचा एखादा फंडा लोकांना कळून चुकायच्या आतच दुसरा स्कॅम घेऊन येत असल्याने, सायबर पोलिसांना या ठगांच्या मुसक्या आवळण्यात अजूनही म्हणावे तसे यश आलेले नाही. आता व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड अर्थात ऑडिओ फ्रॉड चांगलाच चर्चेत असून, कित्येकांना याचा अनुभव येत आहे. त्यातील काहींची फसवणूकही झाली आहे. सायबर ठग एआयच्या मदतीने एखाद्याच्या आवाजाची हुबेहूब कॉपी करीत आहेत. हल्ली एखाद्यास दिवसातून अंदाजे वीस कॉल येत असतील, तर त्यातील पाच ते सात कॉल हे 'स्कॅम' कॉल्स असतात. हाच फॉर्म्युला सायबर ठग वापरत आहेत. समोरच्याच्या आवाजाची कॉपी करून जवळच्या व्यक्तींना फोन करून पैसे मागितले जात आहेत. नाशिकमध्ये याबाबतच्या फसवणुकीचा एकही गुन्हा दाखल झाला नसला तरी, 'व्हॉइस क्लोनिंग फ्रॉड'ची सध्या अनेकांमध्ये धास्ती असल्याचे दिसून येत आहे. (Voice Cloning Fraud)

अशी आहे मोडस ऑपरेंडी

अगोदर स्कॅम कॉल किंवा राँग नंबरच्या बहाण्याने एखाद्यासोबत जास्तीत जास्त वेळ बोलण्याचा प्रयत्न केला जातो. यादरम्यान, संबंधिताचे पूर्ण नाव जाणून घेण्यासाठी आटापिटा केला जातो. तो कॉल रेकॉर्ड करून नंतर एआय टूलच्या मदतीने त्या आवाजाची हुबेहूब कॉपी केली जाते. त्यानंतर नावाच्या सहाय्याने सोशल अकाउंट शोधून त्यातील फ्रेंड लिस्टमधून मित्र, नातेवाईक यांचा शोध घेतला जातो. त्यातील काहींना सुंदर मुलीचा प्रोफाइल असलेल्या फेक अकाउंटवरून चॅटिंग करून त्यांचे नंबर मिळवले जातात. त्यानंतर त्यांना दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून कॉल करून आपला हुबेहूब आवाज ऐकविला जातो. 'माझा मोबाइल खराब झाला आहे, मी माझ्या मित्राच्या फोनवरून कॉल केला आहे. मी एका अडचणीत सापडलो आहे, मला तत्काळ पैसे हवे आहेत, मी बारकोड पाठवतो, लगेचच यावर पैसे फॉरवर्ड कर' असे सांगितले जाते. हुबेहूब आवाज असल्याने मित्र तथा नातेवाईक त्यास बळी पडत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. (Voice Cloning Fraud)

३ सेकंदाची ऑडिओ क्लिप पुरेशी

एका सर्व्हेनुसार भारतातील प्रौढ असलेले ८६ टक्के लोक आठवड्यातून एकदा तरी सोशल मीडियावर आपल्या आवाजाचा व्हिडिओ अथवा ऑडिओ टाकतात. मित्र, प्रेयसी, नातेवाईक यांना रिप्लाय देताना आपण व्हाॅइस नोट पाठवतोच. याचाच वापर करून सायबर गुन्हेगार एआयच्या मदतीने आपल्या आवाजाची हुबेहूब कॉपी करतात. एआय टूलला आवाजाची कॉपी करण्यासाठी केवळ तीन सेकंदाची ऑडिओ क्लिप आवश्यक आहे. हे टूल सुमारे ६० हजार तासांच्या इंग्रजी भाषण डेटावर प्रशिक्षित केले गेले आहे आणि ते सहजपणे ऑडिओ कन्टेन्ट तयार करू शकते.

व्हिडिओ कॉलचाही धोका

एआयमधील डीपफेक या टूलचा वापर करून व्हिडिओ कॉलही येऊ शकतो. तुमच्या ओळखीचा व्यक्ती तुम्हाला समोर दिसेल, त्यामुळे काही सेकंद तुम्ही बुचकळ्यात पडाल अन् पैसे पाठवाल. पण तुम्हाला ज्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन आलाय, त्याला स्वत:च्या फोनवरून कॉल करायला सांगा अथवा तुम्ही फोन करून खात्री करा. अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आल्यास सावधच राहा. त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ बोलल्यास तुम्हाला लगेच फ्रॉड असल्याचे समजेल.

अशी घ्या काळजी

– अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास अन् पैसे अथवा क्रेडिट, डेबिट कार्डच्या डिटेल्स मागितल्यास लगेचच विश्वास ठेवू नका.

– ज्यांच्या आवाजात फोन आला आहे त्या व्यक्तीच्या मूळ मोबाइल क्रमांकावर फोन करून खात्री करून घ्या.

– उगाचच अधिक काळ बोलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर बोलणे टाळा.

– जवळच्या व्यक्तींविषयींची माहिती विचारल्यास अजिबात देऊ नका.

– वारंवार असे फोन येत असतील तर पोलिसात तक्रार करा.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news