पुणे : मी भिंतीवर श्री विठ्ठल यांंचे चित्र साकारले. पालखी सोहळ्यासाठी आपणही सेवा बजावत असल्याचा आनंद आहे. हे काम करताना काहीतरी चांगले करत असल्याची भावना मनात आहे. अशा देदीप्यमान सोहळ्यात आपणही योगदान देत असल्यामुळे खूप उत्साह आहे, असे चित्रकार हुसेन मेहबूब शेख सांगत होता. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांंच्या पालखीचे सोमवारी (दि. 12) पुण्यात आगमन होणार आहे.
तत्पूर्वी मध्यवर्ती पेठांसह विविध ठिकाणी जोमाने तयारी सुरू असून, त्यात सर्वधर्मीयही उत्साहाने सहभागी झाले आहेत. पालखी सोहळ्याच्या सेवेत आपणही योगदान देत असल्याचा आनंद प्रत्येकाला असून, प्रत्येकजण मोठ्या ऊर्जेने आणि मेहनतीने सोहळ्याची तयारी करत आहे. कोणी आरोग्यसेवेत, तर कोणी विद्युत रोषणाईसाठी सहकार्य करीत आहे. कोणी वारकर्यांच्या जेवणासाठीची व्यवस्था करत आहे, तर कोणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करत आहे, असे चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत असून, जात-धर्मांच्या पलीकडे जात, माणुसकी जपत सगळेजण कामाला लागले आहेत.
त्यात मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन असे कित्येक समाजातील लोक सहभागी झाले असून, तेही या अद्वितीय सोहळ्यासाठी आपली सेवा बजावताना पाहायला मिळत आहे. चित्रकार असद मोहमद हनीफ मोमीन म्हणाले, मी विविध ठिकाणी पालखीसाठी चित्र साकारण्याच्या उपक्रमात सहभागी झालो आहे. पालखी सोहळ्यासाठी चित्र काढून चांगले वाटले. धर्माच्या पलीकडे माणूसपण जपत आम्ही चित्र साकारत होतो. आपणही पालखी सोहळ्यासाठी काहीतरी करत असल्याची भावना मनात होती.
दरवर्षी पुण्यात पालखीचा मुक्काम असणार्या दोन्ही मंदिरांच्या ठिकाणी चित्र साकारत आहोत. यंदाही आम्ही विविध ठिकाणी चित्र साकारले असून, त्यात मुस्लिम समाजबांधवांनीही उत्साहाने सहभाग घेतला. येथे धर्मा-धर्माचा भेद विसरत सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले.
– नीलेश आर्टिस्ट
हेही वाचा