पुढारी ऑनलाईन : सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीतील परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी या जागेबाबत फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसतर्फे इच्छुक असलेले उमेदवार विशाल पाटील देखील उपस्थित होते. (Sangli Lok Sabha Vishwajeet Kadam)
सांगली हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत असून त्यासाठी सांगलीच्या जागेची मागणी केली. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यातील जागा ही काँग्रेस लढवण्यासाठी सक्षम आहे. पण याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला. त्यांनी चंद्रहार पाटील यांची अचानक उमेदवारीही जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.
ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिका घेतली की सांगलीबाबत ठाकरेंनी घेतलेला निर्णय थोडासा एकतर्फी होता आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला व्यक्तीशः आदर आहे. पण सांगलीला एक राजकीय इतिहास आहे. सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. पुढील काही दिवसांत आम्ही काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या भावना समजून घेऊ. विशाल पाटील स्वतः कार्यकर्त्यांना भेटतील. त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडू आणि महाविकास आघाडीकडे याबाबत सकारात्मक मार्ग कसा निघेल यासाठी प्रयत्न करु. तसेच महाविकास आघाडीने सांगलीच्या जागेबाबत पुनर्विचार करावा, असे विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतर्फे सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. याबाबतची घोषणा मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. पण उमेदवारीच्या पेचामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. सांगली हा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसने या जागेवर त्यांचा दावा कायम ठेवला आहे. (Sangli Lok Sabha Vishwajeet Kadam)
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादावर मंगळवारी पडदा पडला होता. जागावाटपाच्या सूत्रात शिवसेना मोठा भाऊ ठरला. ठाकरे गट २१ जागांवर तर काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० जागांवर लढणार आहे. सांगलीची जागा ठाकरे गटच लढविणार असून भिवंडी राष्ट्रवादी (शरद पवार) लढणार आहे. सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाकडे गेल्याने सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला आहे. यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा :