सांगली : महाविकास आघाडीतर्फे सांगली लोकसभा मतदार संघाची उमेदवारी ठाकरे शिवसेनेला मंगळवारी जाहीर झाली. उमेदवारीच्या पेचामुळे सांगली राज्यभर बहुचर्चित झाली होती. सांगली हा बालेकिल्ला असलेल्या काँग्रेसने या जागेवर दावा केला होता आणि अजूनही आहे. तो नैसर्गिक आणि पारंपरिक न्यायाने यथोचितच म्हणावा लागेल. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेत सांगलीच्या जागेवरून चांगलीच जुंपलेली महाराष्ट्राने पाहिले. आघाडीतर्फे ही जागा आता ठाकरे शिवसेनेला सोडली असली, तरी सामना मात्र तिरंगी होण्याचीच सध्याची चिन्हे आहेत. काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार विशाल पाटील अपक्ष म्हणून लढण्याची मोठी शक्यता आहे. 'शड्डू ठोकून मी कुस्ती खेळणारच,' या त्यांनीच जाहीर केलेल्या भूमिकेकडे आता महाराष्ट्राचे लक्ष आहे. (Sangli Lok Sabha)
आघाडीने ठाकरे शिवसेनेला सांगलीची जागा देऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे आता काँग्रेस पक्ष काय करणार? काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार विशाल पाटील लढणार का? ते अपक्ष लढणार की शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्ष मदतीला धावून येण्याची काही शक्यता संभवते? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे येणार्या काही दिवसांत मिळतील. विशाल पाटील यांना जिल्ह्यात सहानुभूती आहे. त्यांनी लढावे, असे जनमानस आहे. त्याचे काही तीव्र पडसाद समाजमाध्यमातही उमटत आहेत.
सांगली आणि राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील घराण्याचे अस्तित्व राखण्यासाठी, स्वतःच्या दूरवरच्या राजकीय वाटचालीचे भवितव्य ठरविण्यासाठी, विशाल यांनी लढले पाहिजे. ते लढले तर आणि तरच राजकीय पटावरील त्यांचेही महत्त्व राहील, ते वाढत जाईल. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विचार, भावना लक्षात घेऊन ते निर्णय घेतील, अशी अपेक्षा. ते आखाड्यात उतरले तरच कुस्ती तुल्यबळ होईल. त्याचा फायदा पुढील राजकारणासाठी त्यांच्यासह काँग्रेस पक्षासाठी मोलाचा असेल. येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी लढणे ही त्यांची, काँग्रेसची जमेची बाजू ठरेल, अशी चर्चा आहे.
विशाल पाटील यांच्या निर्णयामध्ये काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतृत्व, माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांची भूमिका कळीची आहे. विशाल यांच्यासह समस्त काँग्रेसजनांनी विश्वजित यांना जाहीर कार्यक्रमात नेतेपद बहाल केलेले आहे. त्यांनी विशाल यांना हिरवा कंदील दाखवावा आणि त्यांच्या मागे ताकद उभी करावी, अशी पक्षातील नेत्यांसह जनतेचीही भावना आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता समस्त राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना ठाकरे शिवसेनेने पक्षात प्रवेश दिला. त्याचवेळी सांगलीतून लोकसभेसाठी त्यांची उमेदवारीही जाहीर केली. त्यानंतर मिरजेत येऊन या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन चंद्रहार यांच्या नावाची घोषणाही केली. हे सारे विलक्षण गतीने केले. त्यानंतर खासदार संजय राऊत चंद्रहार यांचे नाव छातीठोकपणे वारंवार सांगत राहिले. 'सांगलीचा विषय संपला' असे ते पुन्हा, पुन्हा सांगत होते. राऊत यांनी सांगलीत दोन दिवस मुक्काम ठोकला. चंद्रहार यांच्या प्रचारार्थ गाठीभेटी घेतल्या, जुळवाजुळव करण्याचा काहीएक प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आले नाही. याउलट त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे ते रोषाचे धनी ठरले. माजी मंत्री अजितराव घोरपडे, भाजप नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांना ठाकरे शिवसेनेची जिल्ह्यात ताकद नाही, हे स्पष्ट सांगत पाठिंबा देण्यास असमर्थता दाखवली.
ठाकरे शिवसेनेचा हा 'उद्योग' सुरू असताना काँग्रेसही सांगलीच्या जागेसाठी अखेरपर्यंत आग्रही राहिली आणि अजूनही आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आदी काँग्रेसजनांनी सांगलीची जागा लढविणारच, असा निर्धार वारंवार व्यक्त करत होते. आजही ते या निर्धाराशी ठाम आहेत. सांगलीची जागा मिळविण्यासाठी ते राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वाला साकडे घालत होते. आता सर्व जण लढण्याचा निर्धार करतील, असे सध्याचे मंथन सांगते. (Sangli Lok Sabha)
लक्षात घेतले पाहिजे की 2019 च्या निवडणुकीमध्ये विशाल पाटील स्वाभिमानी संघटनेतर्फे बॅट या निवडणूक चिन्हावर लढले होते. त्यांना तीन लाख 44 हजार मते मिळाली होती. त्यावेळी वंचित आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर रिंगणात होते. त्यांना सुमारे तीन लाख मते मिळाली होती. आताची स्थिती वेगळी आहे. वंचित रिंगणात नाही. परिणामी, काँग्रेसला पर्यायाने विशाल यांना वातावरण खूपच पोषक आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही, कमावण्यासारखे मात्र खूप काही आहे. त्यामुळे त्यांनी लढले पाहिजे, अशी समर्थकांची भावना आहे.
खासदार संजय पाटील आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही लढत एकतर्फी होईल. अशी लढत झालीच तर कोण विजयी होईल, ते समजण्यासाठी कुडमुड्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. या विषयावर समाजमाध्यमात विनोदांचा पाऊस कोसळतो आहे. तात्पर्य काय तर तुल्यबळ लढत होण्यासाठी काँग्रेसने लढण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्याचे दायित्व आता डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे आहे.
वसंतदादा घराण्याचा देदीप्यमान वारसा
जिल्हाभर काँग्रेसची, दादा घराण्याची ताकद
पक्ष आणि पक्षाबाहेरील नेत्यांशी ऋणानुबंध
वसंतदादा कारखाना सुरू असल्याने
सकारात्मक संदेश
जिल्ह्यातील काँग्रेसची एकजूट
आमदार विश्वजित कदमांकडे नेतृत्व
देण्याचा एकमुखी निर्णय