कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेतील राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासस्थानावर ताबा मिळवलेल्या आंदोलकांची या निवासस्थानी चांगलीच मौजमजा सुरु आहे. त्याचे फोटोज, व्हिडीओजही (Viral Video) जगभर व्हायरल होत आहेत. आता नवीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात काही आंदोलक पंतप्रधानांच्या बेडवर बूट घालून कुस्ती खेळत असल्याचे दिसत आहेत. ट्विटरवर Sri Lanka Tweet नावाच्या एका यूजरने हा व्हिडिओ पोस्ट (Viral Video) केला आहे. त्यात काही युवक पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात बेडवर मौजमजा करताना दिसून आले आहेत. आंदोलक प्रोफेशनल www रेसलर असल्याची अॅक्टिंग तसेच एकमेकांसोबत स्टंट करत आहेत. याआधी आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी निवासस्थानात आग लावली होती. त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभेयवर्धने यांनी सांगितले आहे की, राष्ट्रपती १३ जुलै रोजी राजीनामा देतील. तर पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी म्हटले होते की, सर्वरपक्षीय सरकार बनत असेल तर ते राजीनामा देतील. महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान बनले होते.
तसेच याआधी काही लोक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा, डुंबण्याचा आनंद घेताना दिसले होते. जगभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी चक्क राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढले, तर काही आंदोलक येथील शाही किचनमध्ये जेवतानाही दिसले. काही जणांनी राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील बेडवर विश्रांतीचा आनंदही घेतला.
गेल्या तीन महिन्यांपासून राजकीय आणि आर्थिक अस्थैर्याचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर ताबा मिळवला होता. त्यानंतर आज रविवारी येथे आंदोलकांना नोटांची लाखो रुपयांची बंडले आढळून आली आहेत. श्रीलंकेच्या चलनात १.७८ कोटी रुपयांची ही रोकड आहे. हा संपूर्ण पैसा आंदोलकांनी सैन्याकडे सोपवला आहे. अनेक भागांत संचारबंदी लोकांचे जत्थेच्या जत्थे राजधानी कोलंबोकडे येत आहेत. त्यामुळे एकूण येथे सर्वत्र अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती पाहून पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे.
श्रीलंकेत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटात आता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून फरार झाल्याचे समोर आले आहे. ते एखाद्या शेजारील देशात असल्याचे सांगितले जात आहे. ते बुधवारी श्रीलंकेत परतणार असल्याचे समजते. दरम्यान, गोटाबाया यांनी अधिकृतरीत्या राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना माहिती दिली आहे. राष्ट्रपती घोषणेनुसार राजीनामा देतील, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. श्रीलंकेतील मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर नंदलाल वीरसिंघे यांनी नोकरी सोडण्याच्या अटकळी फेटाळल्या आहेत. तथापि, राजकीय अस्थिरता असेल तर दिलासा पॅकेज देण्यास विलंब होऊ शकतो, असे ते म्हणतात. राष्ट्रपती भवनातील पहिल्या मजल्यावर लाकडी कपाटासमोर गुप्त बंकरचा व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे याच मार्गाद्वारे फरार झाल्याची चर्चा आहे.
श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार बनल्यानंतर आता विक्रमसिंघे सरकारमधील मंत्रीही राजीनामा देणार आहेत. नवीन सरकार स्थापनेसाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विरोधक यात यशस्वी झाले तर दोन महिन्यात तिसरे सरकार श्रीलंकेत स्थानापन्न होईल.