सांगली : ‘जत विस्तारित योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी’

विलासराव जगताप
विलासराव जगताप

जत : पुढारी वृत्तसेवा : जतच्या वंचित ६५ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल १९०० कोटी रुपयांची केलेली घोषणा आणि जानेवारीत काम सुरू करू असे दिलेले आश्वासन हे दोन्ही खोटे आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याची टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

विलासराव जगताप म्हणाले की, काल सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक ही म्हैसाळ योजनेसाठी नव्हती. तर जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी २०० कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु, विस्तारित योजनेबाबत १९०० कोटी रुपयांची घोषणा केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.

कारण या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, त्याचे बजेटचे विषय अजूनही कॅबिनेटसमोर आलेला नाहीत. शिवाय कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे खाते आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारी देखील उपस्थित नव्हते.

कर्नाटकने जतवर केलेल्या दाव्यानंतर येथील जनतेचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे वक्तव्य केले असावे. जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी काँक्रीट असा निर्णय होत नाही, तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जत म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पाणी योजनांचे जाणकार, अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा अशी आमची मागणी आहे, असेही जगताप म्हणाले.

हे वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news