पुढारी ऑनलाईन डेस्क : Venkatesh Prasad : भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने शनिवारी आपल्या अनेक ट्विटने खळबळ उडवून दिली. एकीकडे नागपूर कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच प्रसादने केएल राहुलच्या टीम इंडियातील निवडीवरून प्रश्न उपस्थित केले आणि त्याला कसोटी संघात घेणे एकप्रकारे 'पक्षपातीपणा' असल्याचा गंभीर आरोप केला. राहुलमुळेच फॉर्मात असलेल्या शुभमन गिलसारख्या खेळाडूला संघाबाहेर बसावे लागल्याचीही टीप्पणी त्याने केली.
नागपूर कसोटीतून फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला कट्ट्यावर बसवून 30 वर्षीय राहुलला प्राधान्य देण्यात आले. राहुल हा कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. नागपूर कसोटीत तो रोहितसह सलामीला आला आणि त्याने केवळ 71 चेंडूत 20 धावा काढून बाद झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा एकदा राहुल टीकेचा धनी बनला आहे.
व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) म्हणाला की, केएल राहुलच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे आणि हे गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. त्याने आपल्या क्षमतेचे कामगिरीत रूपांतर केले नाही. असे असूनही राहुलची निवड कामगिरीच्या आधारावर नाही तर पक्षपातीपणाच्या आधारावर करण्यात येत आहे, असे गंभार आरोप केले आहेत. यापूर्वी माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही उपकर्णधाराला वगळता येणार नाही, असा कोणताही नियम नसल्याचे म्हटले होते.
'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठ वर्षांहून अधिक काळ घालवल्यानंतर केएल राहुलची 46 कसोटींमधील 34 ची सरासरी अगदीच सामान्य आहे. मयंक अग्रवालने राहुलपेक्षा कसोटीत खूप चांगला प्रभाव पाडला आहे. माझ्या मते इतर कोणत्याही खेळाडूला इतक्या संधी देण्यात आलेल्या नाहीत. असे अनेक खेळाडू आहेत जे जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही प्रदार्पणाची प्रतिक्षा करत आहेत. वनडे, टी-20 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा शुभमन गिल, प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडणारा सरफराज खान यांना राहुल ऐवजी निवडले जावे. तसेच क्रिकेटचे चांगले ज्ञान असलेल्या रविचंद्रन अश्विनसह चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांच्यापैकी कुणालाही कसोटी संघाचा उपकर्णधार बनवायला हवे, अशी मागणीही प्रसादने (Venkatesh Prasad) केली आहे.
प्रसाद पुढे म्हणाला, 'काही लोक इतके भाग्यवान असतात की त्यांना यशस्वी होण्याच्या अनेक संधी दिल्या जातात. तर अनेकांना काहीच मिळत नाही. मी राहुलच्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा आदर करतो पण त्याची कामगिरी जेमतेम आहे. तो आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. दरम्यान, खराब कामगिरी करूनही राहुलला कसोटी संघात स्थान मिळते हे त्यापैकी एक कारण आहे,' असा दावा त्याने केला आहे.