बारामती : पुढारी वृत्तसेवा : शहरातील जुन्या भाजी मंडईतील गाळे पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल उभे केले जाणार आहे. येथील छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी (दि. १८) थेट नगरपरिषदेत येउन बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठक घेउन व्यापाऱ्यांच्या प्रश्नातून समन्वयाने मार्ग काढा,त्यांना विश्वासात घेऊन काम करा अशा सूचना पवार यांनी या बैठकीत प्रांताधिकारी वैभव नावडकर व मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिल्या. बारामती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या जुनी भाजी मंडईत ९६ गाळेधारक व ९८ ओटेधारक आहेत. तेथे पालिकेकडून व्यापारी संकुल उभे केले जाणार आहे. मात्र येथील स्थानिक व्यापाऱ्यांच्या यासंबंधी काही मागण्या आहेत. त्यासाठी त्यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार सध्या बारामतीत असल्याने त्यांनी या प्रश्नी शनिवारी थेट पालिकेत येउन प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेतली.
संबंधित बातम्या :
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर यांनी गाळेधारकांच्या वतीने पवार यांना तेथील व्यापाऱ्यांच्या अडचणी व नवीन इमारतीतील नवीन अनामत रक्कम,भाडेवाढ व आता जुन्या जागेत असणाऱ्या इमारतीसारखी नवीन इमारत बांधावी अशी मागणी केली.त्रिसदस्यीय समिती यासंबंधीचा निर्णय घेत भाडे ठरविणार असल्याचे मुध्याधिकारी रोकडे यांनी स्पष्ट केले. शिवाय गाळेधारकांची तात्पुरती व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले. पर्यायी गाळे मिळेपर्यंत आहे त्याच ठिकाणी व्यवसाय करता येईल असेही स्पष्ट केले.
पवार यांनी गाळेधारकांना विश्वासात घ्या, होणाऱ्या व्यापारी संकुलाची सविस्तर माहिती त्यांना द्या, संकुलाचे काम किती दिवसात होणार, अनामत रक्कम किती असेल, ते माफक असावे, भाडेवाढ किती होणार आदी प्रश्न उपस्थित करत मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेवून व्यापाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी त्यांना लेखी द्या असेही सांगितले.
शरद पवार व जुन्या आठवणी
यावेळी जुनी भाजी मंडईतील व्यापारी रफिक अत्तार यांच्याशी बोलताना शरद पवार यांनी ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आत्तार यांनी पवारांशी बोलताना त्यावेळच्या सहकाऱ्याचे नाव चुकवले. पवारांनी त्यात दुरुस्ती करत कलंदर अमन शेख असे त्यांचे नाव होते अशी दुरुस्ती केली. पवार यांच्या तल्लख बुद्धीची प्रचिती यावेळी व्यापाऱ्यांना आली.