बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यात साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य पद्धतीने चालवली जात असून त्यामुळे अपघात घडत आहेत. बेकायदेशीर ऊस वाहतुकीला आळा बसावा यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना नोटीस देत बेकायदेशीर वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक आदी वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ऊस वाहतूक प्रामुख्याने ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक तसेच बैलगाडीतून प्रामुख्याने होत असते. ही वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने प्रवास करीत असतात किंवा रस्त्यावर उभी असतात. रस्त्याने प्रवास करणार्या इतर वाहनांना त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ब—ेकिंग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे मागून धडक बसून अपघात होण्याचा जास्त संभव असतो.
संबंधित बातम्या :
वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टीव्ह टेप न लावणे, वाहनांचा वेग, एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे न लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनात म्युझिक सिस्टीम लावणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे, वाहने रस्त्यांच्या कडेला उभी करणे, वाहनांच्या ट्रॉलीबाहेर ऊस भरणे, शेतातून मुख्य रस्त्यांवर इतर वाहनांचा अंदाज न घेता ट्रॅक्टर, ट्रेलर आणणे आदी कारणांमुळे देखील अपघात होतात. ग्रामीण भागामध्ये ऊस वाहतूक करणार्या वाहनांची विशेषतः ट्रॉलींची नोंदणी झालेली नाही. तसेच चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. अनेक वाहनांचा विमा नाही, अशी स्थिती आहे. आता परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर यावर कारवाई होईल, अशी अपेक्षा सामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.