Uttarkashi tunnel rescue | केवळ थोडे काम बाकी! बोगद्यातून आजच बाहेर येणार ४१ कामगार

Uttarkashi tunnel rescue | केवळ थोडे काम बाकी! बोगद्यातून आजच बाहेर येणार ४१ कामगार

पुढारी ऑनलाईन : उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी १२ व्या दिवशीही युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य अंतिम टप्प्यात असल्याने अडकलेल्या कामगारांना आज बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी म्हटले आहे की, "ऑगर मशीन काम पुन्हा सुरु झाले आहे. आम्ही ६ मीटरच्या आत २-३ पाईप पाठवण्याचा प्रयत्न व्यक्त करत आहोत. आम्हाला आशा आहे की, आजच्या दिवसाच्या अखेरीस आम्हाला कोणतेही अडथळे न आल्यास बचावकार्य पूर्ण होईल." (Uttarkashi tunnel rescue)

संबंधित बातम्या 

तर " बोगद्यातील बहुतांश अंतर पार केले आहे, फक्त आणखी थोडे काम बाकी आहे," असे उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी अभिषेक रुहेला यांनी म्हटले आहे. बचावपथके अडकलेल्या कामगारांच्या जवळ पोहोचण्यासाठी सिल्क्यारा बोगद्याच्या कोसळलेल्या भागाच्या ढिगाऱ्यातून ड्रिल करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी अडथळा दूर केल्याचे त्यांनी सांगितले.

आज एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना उत्तरकाशी जिल्हा दंडाधिकारी रुहेला म्हणाले की, गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले बचावकार्य पूर्ण करण्यासाठी आणखी थोडे काम बाकी आहे. (Uttarkashi tunnel collapse latest news)

बचावपथकांनी अमेरिकेच्या ऑगर मशीनचा वापर करून मंगळवारी पुन्हा ड्रिलिंग सुरू केले आणि बुधवारी रात्री उशिरापर्यंत सिल्क्याराकडील बाजूला ४५ मीटरपर्यंत ड्रिलिंग केले. या मार्गात ६० मीटरपर्यंत ढिगारा आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आज बोगद्याच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी बचावकार्य अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. "ऑगर मशीनद्वारे ४५ मीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. बचावकार्य अंतिम टप्प्यात आहे. काही अडथळे आहेत. पण मला आशा आहे की कामगारांची लवकरात लवकर सुटका होईल," असे धामी म्हणाले.

तांत्रिक अडचणींवर मात करत बचावकार्य

उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी म्हणाले, की "आम्ही बहुतांश अंतरावरील ढिगारा उपसला आहे. आता फक्त थोडेच काम शिल्लक आहे. आमची पथके तांत्रिक अडचणींवर मात करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. आम्ही तज्ज्ञ आणि कुशल व्यक्तींचा सल्ला घेत आहोत, काहींना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. बचावकार्य कधी संपेल हे सांगता येत नाही. पण हे काम सातत्याने सुरू असून त्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडून लक्ष ठेवले जात आहे, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून दिल्लीतील वेल्डिंग तज्ज्ञांना सिल्क्यारा बोगद्याजवळ आणण्यात आले आहे.

वेल्डर अभियंत्यांनाही पाचारण

"ऑगर मशीनद्वारे टाकण्यात आलेली ४५ मीटर पाईपलाईन थोडाशी वाकली झाली आहे. ती व्यवस्थित केली जात आहे. ही वाकलेली पाईप दुरुस्त केली जाऊ शकते अथवा पाईप पुन्हा त्याच पातळीवर हलवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, हे पाहण्यासाठी वेल्डर अभियंत्यांना पाचारण करण्यात आले आहे." असे उत्तरकाशी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (uttarkashi tunnel rescue update)

१२ नोव्हेंबर रोजी सिल्क्यारा ते बारकोट दरम्यान काम सुरु असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला. बोगद्याच्या सिल्क्याराकडील बाजूच्या ६० मीटरच्या पट्ट्यात ढिगारा कोसळल्याने ४१ कामगार आत अडकले. कामगार २ किमीच्या भागात अडकले आहेत. त्यांना आज सुरक्षित बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी बोगद्याजवळ रुग्णवाहिका, डॉक्टरांची पथके सज्ज ठेवली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news