ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ‘एआय’ प्रणाली मोलाची: पंतप्रधान

ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ‘एआय’ प्रणाली मोलाची: पंतप्रधान

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवादासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' कार्यक्रमातून आता विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोबांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाची दखल घेतली गेली आहे. देशभरातील अनेक प्रतिभावंत, सार्वजनिक उपक्रम, शहरांचा मोदी यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्यात येणार आहे. हा दिन लक्षात घेता नरेंद्र मोदी यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका प्रणालीचा आज उल्लेख केला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. चंद्रपुरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघांसोबतच बिबट, अस्वल आदी वन्यजीवांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या भागांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष सातत्याने घडतो. यातून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागतो. वन्यजीव हानीही होते.

ताडोबा-अंधारी प्रकल्पात कार्यान्वित झालेल्या या सतर्कता प्रणालीमुळे जंगलाला लागून असलेल्या गावांमधील ग्रामस्थांवरील वन्यजीवांचे हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन विभागाने राबविलेला उपक्रम व विश्व वन्यजीव दिवसाचा संदर्भ जोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये वनक्षेत्रात सुरू झालेल्या 'एआय' वापराची स्तुती केली. पंतप्रधान म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर वाढत जाणार आहे. सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण वाढले, तर त्याचा परिणाम वन्यजीव आणि जैवविविधतेवर होणार आहे. अशात वन्यजीव आणि वन संवर्धन काळाची गरज आहे.

मात्र, निर्माण होणारा मानव-वन्यजीव संघर्ष मोठी समस्या आहे. अशात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वापरण्यात येत असलेली 'एआय' प्रणाली मोलाची ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीने तंत्रज्ञानाचा मानव कल्याणासाठी व देशहितासाठी वापर केल्यास त्यातून संभाव्य संकटांवर वेळीच मात करणे शक्य होऊ शकतो यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने भर दिला आहे. आतापर्यंतच्या 'मन की बात'मध्ये अनेकदा विदर्भ, महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचा, व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा महाराष्ट्रात फोकस यानिमित्ताने अधोरेखित झाला आहे. यवतमाळला 28 रोजी ते येत असून महिला मेळावा, नांदेड परिसरातील विविध रेल्वे स्थानके सुविधा लोकार्पण, वर्धा- नांदेड रेलवे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील वर्धा -कळंब मार्ग उदघाटन मोदींच्या हस्ते होत असल्यामुळे महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचे विशेष लक्ष असल्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news