US jets intercept Russian aircraft | तणाव वाढण्याची चिन्हे?; अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी रशियन बॉम्बर विमानांना रोखले

US jets intercept Russian aircraft | तणाव वाढण्याची चिन्हे?; अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी रशियन बॉम्बर विमानांना रोखले
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन; युक्रेनमधील युद्धावरून रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. अशातच दोन अमेरिकन F-१६ लढाऊ विमानांनी अलास्काजवळ चार रशियन विमानांना रोखले आहे. याबाबतची माहिती संयुक्त यूएस-कॅनेडियन नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड (Norad) ने दिली आहे. अमेरिकेने रोखलेल्या रशियाच्या विमानांमध्ये TU-95 BEARH-H आणि Su-35 लढाऊ विमानांचा समावेश होता, असे Norad ने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. (US jets intercept Russian aircraft)

फायटर जेट आणि बॉम्बरसह चार रशियन विमानांनी सोमवारी अलास्काजवळील आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्राच्या बफर झोनमध्ये उड्डाण केले होते. पण रशियन विमाने आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीतच राहिली आणि त्यांनी अमेरिकन अथवा कॅनडाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला नाही. असे नियमितपणे घडते आणि त्याकडे धोका म्हणून पाहिले जात नाही, असे निवेदनातून सांगण्यात आले आहे.

रशियन विमानांना रोखण्याची ही नियमित प्रक्रिया आहे. २००७ पासून उत्तर अमेरिकन एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये (ADIZ) वर्षातून सहा ते सात वेळा रशियन विमानांना रोखले गेले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये अलास्का आणि कॅनडाच्या किनारपट्टीवर दोन रशियन सागरी गस्ती विमाने घिरट्या घालताना आढळून आली होती. तर ऑगस्टमध्ये पाळत ठेवणाऱ्या एक रशियन विमानाने अलास्का एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये प्रवेश केला होता.

युक्रेनमधील युद्धावरून रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. याच दरम्यान रशियन विमाने अमेरिकेने रोखली आहेत. तर दोन डच F-35 लढाऊ विमानांनी सोमवारी पोलंड हवाई हद्दीजवळ रशियन लष्करी विमानांना रोखले होते, असे संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले. रशियन विमानांना रोखल्याचा संबंध अमेरिकेने नुकत्याच उंचावरुन खाली पाडलेल्या दोन अज्ञात वस्तूंशी नाही, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (US jets intercept Russian aircraft)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लढाऊ विमानाने नुकतीच हुरॉन सरोवरावर उडणारी आणखी एक अज्ञात वस्तू खाली पाडली होती. अमेरिकेने गेल्या काही दिवसांत अशा ४ उडणाऱ्या संशयास्पद वस्तू नष्ट केल्या आहेत. याआधी अमेरिकेच्या फायटर जेटने अलास्का येथे उंचावर उडणारी एक अनोळखी वस्तू (US shot down an object) खाली पाडली होती. ही वस्तू एका छोट्या कारच्या आकाराची असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले होते. (Chinese spy balloon row)

तर जानेवारीच्या अखेरीस चीनचा स्पाय बलून (हेरगिरी बलून) अमेरिकेने पाडला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उच्च सतर्कता बाळगण्यात आली आहे. बलून पाडण्यापूर्वी अमेरिकेने आपली तिन्ही विमानतळे बंद केली होती. चिनी बलून ६० हजार फुटांवर उडत असताना हवाई दलाच्या लँगले तळावरून अमेरिकेने मारा केला. बलूनचे अवशेष समुद्रात कोसळले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news