पुढारी ऑनलाईन डेस्क : एका व्यक्तीच्या पोटातून चक्क 63 चमचे बाहेर काढले आहेत. तुम्हाला ही घटना वाचून वाटलं असेल आपण काही चुकीच वाचत नाही ना? तर अशीच घटना घडली आह उत्तर प्रदेशमधील (UP-Muzaffarnagar) मुझफ्फरनगरमध्ये. सध्या त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. चला तर पाहूया काय आहे नेमकी घटना.
उत्तर प्रदेश राज्यातील मुझफ्फरनगर शहरातील बोपारा गावातील मूळ रहिवासी असलेल्या विजय चौहानच्या बाबतीत ही विचीत्र घटना घडली आहे. विजय चौहान १५ दिवसांपूर्वी पोटदुखीने त्रस्त होता म्हणून तो जवळच्या मेरठस्थित खासगी रुग्णालयात गेला होता. तेव्हा ही बाब त्याच्या लक्षात आली. त्याच्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
विजय चौहानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने सांगितले की, विजयची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला काही दिवसांत रुग्णालयातून सोडण्यात येईल. या प्रकरणी बोलताना सर्जन डॉ. राकेश खुराना म्हणाले, "मुझफ्फरनगरमधील बोपारा गावातील मूळ रहिवासी असलेले विजय चौहान १५ दिवसांपूर्वी पोटदुखीने आमच्याकडे आले होते. ते वेदनेने त्रस्त होते. तपासणी दरम्यान आम्हाला त्याच्या पोटात चमच्यासारखे काहीतरी आहे हे लक्षात आले. त्याच्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया करावी लागेल हे सांगितले. शस्त्रक्रियेदरम्यान लक्षात आले की, त्याच्या पोटात चक्क 62 चमचे आणि आतड्यात एक चमचा आहे. असे एकूण ६३ चमचे आढळले. अशा प्रकारची ही पहिलीच केस असल्याचे डॉ. राकेश खुराना म्हणाले.
अधिक माहिती देताना डॉ. खुराना म्हणाले की, हा रुग्ण ड्रग्जच्या आहारी गेलेला आहे. त्याने गेल्या सात महिन्यांपासून त्याच्यावर शामली येथील पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू होते. हे चमचे त्याने कसे आणि का गिळले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण रुग्ण आम्हाला परस्परविरोधी माहिती देत आहे. त्याने एकदा आम्हाला सांगितले की पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्याला चमचे गिळण्यास भाग पाडले. तर काही वेळा सांगतो , त्याने स्वतःच्या इच्छेने चमचे गिळले. सध्या तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
हेही वाचलंत का?