Pune : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले भात पीक वाया

Pune : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले भात पीक वाया

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले भात पीक वाया गेले आहे. त्यामुळे भात उत्पादक आदिवासी शेतकरी हतबल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून बाधित शेतकर्‍यांना  नुकसानभरपाई द्यावी, पीक विमा कंपनीनेही  याची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
भातकापणीला सुरुवात झाली अन् जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. रात्रभर हा पाऊस सुरू होता. त्यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक वाया गेले आहे. भाताचा पेंडाही (चारा) खराब झाला असून, जनावरांना चार्‍याचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश अतिवृष्टीचा आहे. या परिसरात आंबेमोहर, इंद्रायणी, तांबडा रायभोग, साळ, दगड्या, खडक्या आदी भाताच्या जाती पिकवल्या जातात. यंदा फुलवडे, बोरघर, आडिवरे,  पांचाळे कुशिरे, मेघोली, जांभोरी, राजेवाडी,  पोखरी, चिखली, तळेघर, कोंढवळ, निगडाळे, साकेरी, पाटण, पिंपरी, नानवडे,  न्हावेड, आसाणे, माळीण, कोढरे, दिगद, गोहे, डिंभे आदी परिसरात सुमारे 5  हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे.

मात्र, गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने भातशेती संकटात सापडत आहे. या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला. त्यानंतरच्या काळात जोरदार पाऊस झाला. यातून कसेबसे भात पीक आले. त्याला बुधवारी (दि. 9) रात्री झालेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसाने उभे पीक भुईसपाट झाले. जवळपास 3 हजार हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे. डोळ्यांसमोर काढणीला आलेले पीक वाया गेल्याने आदिवासी शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी तसेच विमा कंपन्यांनीही विमाभरपाई द्यावी, अशी मागणी या भागातून होत आहे.

ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला, त्यांनी 18002660700 व 7304524888 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून लिंक मागवावी. त्यात माहिती भरून पोस्ट हार्वेस्टिंग सिलेक्ट करून क्लेम करावा व आलेल्या अर्जाचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजना इंगळे यांनी केले आहे.

मंचर, घोडेगाव परिसरात मुसळधार पाऊस

आंबेगाव तालुक्यातील मंचर घोडेगाव परिसरात शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी पाच  वाजण्याच्या सुमारास अर्धा तास  मुसळधार पाऊस झाला. पावसाने रस्त्यावर अनेक ठिकाणी  पाणी साचले होते. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारपासूनच वातावरणात दमटपणा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली जात होती. सायंकाळी  घोडेगाव, मंचर परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अनेक भागात बटाटा पीक काढणीस आले असून, काही शेतकर्‍यांनी कांदा काढणी सुरू केली आहे. या पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक झालेल्या पावसामुळे वैरण, कडबा, झाकण्यासाठी, कांदा चाळीत साठवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ झाली. मंचर – घोडेगाव परिसरात दिवाळीनिमित्त खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची अचानक तारांबळ उडाली.

मुळशीत अवकाळी पावसामुळे शेतकरी, फटाके विक्रेते हतबल

मुळशी तालुक्यात भात पीक कापणी करून शेतात वाळविण्यासाठी ठेवले असताना होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षीप्रमाणे स्टॉल लावण्यात आलेले फटाके विक्रेते पावसामुळे अडचणीत आले आहेत.
दिवाळीची लगबग सुरू असतानाच अवकाळीमुळे मुळशी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या  आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. अशा परिस्थतीमध्ये शासनाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे  तत्काळ पंचनामे करून पीक विम्यातुन नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रगतशील शेतकरी दत्ता शेळके, ज्ञानोबा मांडेकर  यानी केली आहे.

फटाका स्टॉलला फटका
गेल्या वर्षी दिवाळीत पडलेल्या पावसामुळे फटाके स्टॉलधारकाचे नुकसान झाले होते. यंदाही पाऊस पडत असल्याने फटाका स्टॉलधारकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा, मांडव भाडे, वीजबिल व इतर केलेला खर्चही वसूल न होण्याची शक्यता या पडत असलेल्या पावसामुळे निर्माण झाल्याचे फटाका विक्रेते विशाल राऊत आणि विराज गुजराथी
यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news