Pune News : बारा गावांच्या पाणीप्रश्नी रास्ता रोको | पुढारी

Pune News : बारा गावांच्या पाणीप्रश्नी रास्ता रोको

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील 12 गावांच्या पाणीप्रश्नावर थंडावलेले आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे. ऐन दिवाळीत 12 गावांच्या दुष्काळग्रस्त पाणी हक्क समितीचे प्रतिनिधी व शेतकर्‍यांनी पाबळ (ता. शिरूर) येथील बेल्हा -जेजुरी मार्गावर रास्ता रोको करत वाहतूक बंद केली. या वेळी पाबळ – राजगुरुनगर व पाबळ – लोणी त्याचबरोबर  शिक्रापूरकडे जाणारी वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.   या वेळी आंदोलकांनी या भागाला पाणी  मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला.

गेली दोन महिने प्राथमिकपातळीवर आंदोलकांनी  लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. परंतु या समस्येवर मार्ग निघत नसल्याने तीव्रआंदोलन करण्यात येणार आहे, असे संबंधित गावांचे सरपंच व आंदोलकांनी सांगितले. या वेळी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. यामध्ये 19 तारखेला केंदुर येथे साखळी उपोषण व एक डिसेंबरपासून कान्हुर मेसाई येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या वेळी सोपान जाधव, शांताराम चौधरी,  भरत साकोरे, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, हिवर्‍याचे विकास गायकवाड, धामारीचे संपत गायकवाड, कान्हूर मेसाईचे दादासो खर्डे, नामदेव पानसरे आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी आजी-माजी सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  हेही वाचा :

 

Back to top button