देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार : ज्योतिरादित्य सिंधिया

पुणे विमानतळ येथील मल्टिलेव्हल पार्किंगची सुविधा देणार्‍या ‘एरोमॉल’ चे उद्घाटन सिंधिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
पुणे विमानतळ येथील मल्टिलेव्हल पार्किंगची सुविधा देणार्‍या ‘एरोमॉल’ चे उद्घाटन सिंधिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावरून कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी केली.

पुणे विमानतळ येथील बहुप्रतिक्षित व बहुचर्चित असलेल्या मल्टिलेव्हल अत्याधुनिक पार्किंगची सुविधा देणार्‍या 'एरोमॉल' चे उद्घाटन सिंधिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकात पाटील, लोकसभा आमदार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट, राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे दिल्लीचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले. रवी जैन यांनी आभार मानले.

कार्गोची ही सेवा मुंबई पाठोपाठ पुणे विमानतळावरून उपलब्ध होणार आहे. पुण्याचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होत आहे. कला, संस्कृती, व्यापार, औद्योगिकनगरी अशी या शहराची क्षमता व गुणवैशिष्ट्य आहे. पुण्याचा नावलौकिक केवळ देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे, सिंधिया यांनी सांगितले.

नवीन टर्मिनलचा विस्तार मे 2023 पर्यंत सुरू करणार

12 नोव्हेंबरपासून बँकॉकची थेट विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता 1 डिसेंबरपासून सिंगापूरलाही थेट विमान सेवा सुरू होईल, असे मी आश्वस्त करतो. आयटी व अन्य उद्योग व्यवसायाच्या विस्तारासाठी देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचा विस्तार मे 2023 पर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुण्यात आवश्यक असलेल्या सुविधा व प्रकल्पांसाठी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून आम्ही नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व यापुढेही देऊ, असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news