स्वालिया शिकलगार- पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण मागील काही आठवड्यांमध्ये मालगुंड, आंबोली, राजापूर, मालवण, रत्नागिरी पर्यंटनाविषयी असंख्य माहिती घेतलीय. (Unexplored Konkan) या पर्यटनाची माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता. तुम्ही न पाहिलेल्या स्थळांची सुंदर माहिती तुम्हाला या वृत्तामधून मिळेल. आता आम्ही तुमच्यासाठी आणखी काही अप्रतिम ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. काही अशी स्थळे आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसावी. किंबहुना, ती फार कमी लोकांना माहिती असावी. जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. (Unexplored Konkan)
कुणकेश्वर बीच आणि मंदिर – कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर, असं म्हटलं जातं. कुणकेश्वर मंदिराला भेट देणारे पर्यटक, भाविकांची संख्या प्रचंड असते. ११ व्या शतकातील हे प्राचीन महादेवाचे मंदिर अनेक पर्यंटकांना खुणावते. देवगडहून १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. येथे एसटीने जाता येते. बीचजवळ जाताच या मंदिराचा कळस आपले लक्ष वेधून घेतो. मंदिर पाहण्यासारखे आहे. येथे घरगुती जेवणदेखील मिळते. कोकणातील खास सोलकढी पिण्यासाठीदेखील पर्यटक येथे गर्दी करतात. येथे जाण्यासाठी देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी पासून एस.टी. बस आहेत.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे: विजय दुर्ग किल्ला, रामेश्वर मंदिर देवगड, देवगड जेट्टी
मिठमुंबरी बीच – मिठमुंबरी बीच हा अतिशय स्वच्छ व सुंदर आहे कुणकेश्वर पासून अतिशय जवळ आहे. इथे पर्यटकांची गर्दी कमी असते त्यामुळे मनसोक्त आनंद घेता येतो. या ठिकाणाहून सनसेट पाहणं, म्हणजे निसर्गाच्या चमत्काराची अनुभूती घेणं ठरतं. फारशी गर्दी नसणारे हे ठिकाण आहे. देवगडपासून चार किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे बीच आहे. या बीचला खूप कमी लोक भेट देतात. खूप मऊ चमकणारी वाळू आणि निळाशार समुद्र डोळे दिपवणारे आहेत. जवळचं तुम्हाला तारामुंबरी बीच पाहता येईल.
दहिबाव – दहीबाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. दहीबाव आणि मीठबाव अशी दोन गावे याठिकाणी आहेत. येथील महादेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे. लाल गुलाबी रंगाचे छत असणारे महादेवाचे या मंदिराच स्थापत्यशैली अगदी वेगळी आहे. या गावामध्ये जाताना कोकणी पद्धतीची कौलारे घरे, भात शेती, आजूबाजूला नारळ, पोफळी, सुपारीच्या बागा, ओहळ, काजुचे मळे असा हिरवागार निसर्ग वेड लावणारा आहे. शुद्ध हवा आणि रस्त्यालगत असणारे हे मंदिर भक्तीमय वातावरण तयार करतेय. त्याचबरोबर, जर तुम्ही याठिकाणी पावसाळ्यात गेला तर दहिबाव गावातील गुपित धबधबा नक्की पहा. डोंगराच्या कुशीत लपलेला या धबधब्याजवळ गुहादेखील पाहायला मिळते.
मीठबाव – श्री रामेश्वर मंदिर,मिठबाव,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग. हे मंदिर स्थापत्यशास्त्र आणि वास्तू शास्त्र यांचा अभ्यास करून हे मंदिर बांधलेलं आहे. मीठबाव येथे असलेली हिरवीगार झाडी, विशाल समुद्र आणि श्रीदेव रामेश्वराचे मंदिर, रस्त्याच्या दुतर्फा कौलारू घरं, नीरव शांतता पाहून मीठबावला जाण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.
तांबळडेग – निसर्गाची अमाप देणगी लाभलेले गाव म्हणजे तांबळडेग होय. याठिकाणी फार कमी पर्यटक जातात. पण, खरंच तुम्हाला उत्साह, एनर्जी आणि शांततेची अनुभूती करायची असेल तर या ठिकाणी नक्की जा. देवगडपासून ३० किमी, कुणकेश्वरपासून १५ किमी आणि मिठबाव पासून ५ किलोमीटर अंतरावर तांबळडेग आहे. गावात सुरुची बने तुमची नजर उंच आकाशात फेकतात. रुपेरी वाळूच्या कुंचल्यातून जणू समुद्राची निर्मिती झाल्याचा येथे भास होतो. समुद्र किनाय्राला लागूनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता गजबा देवीचे मंदिर आहे.
गजबादेवी मंदिर – देवगड तालुक्यातील मिठबाव येथील गजबादेवी हे मंदिर श्रीक्षेत्र आहे. खूप सुंदर आणि कदाचित खूप कमी लोकांना माहिती असलेलं हे सुंदर ठिकाण आहे. गजबादेवी समोरील मंदिर खूप अद्भूत आहे. अत्यंत सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा येथे पाहता येतो. गजबादेवी मंदिरासमोर मीठबाव तांबळडेग समुद्राची किनारपट्टी दिसते. सागरी महामार्गापासून हे ठिकाण आतमध्ये असल्याने या सागराची माहिती फारशी कुणाला नाही. येथे राहण्यासाठी जवळचं एमटीडीसीचे हॉटेल आहे.
आंगणेवाडी – येथे आई भराडीदेवीचे मोठे आणि प्रसिध्द मंदिर आहे. येथे खूप मोठी यात्रा भरते. देवगडपासून आंगणेवाडी ५८ किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी कुणकेश्वर-कटवण-मिठबाव-आचरा तिठा-बांदिवडे-मसुरे-आई भराडी देवी मंदिर असा दिड तासांचा प्रवास करावा लागतो.
देवगड पवनचक्की आणि बाग – हे ठिकाण आता पर्यटन स्थळ झाले आहे. अथांग पसरलेला अरबी समुद्र पटकन नजरेत भरतो. उंचावरून समुद्र आणि पवनचक्की पाहण्याची मजा कुछ और आहे. येथे खूप सारे पर्यटक फोटोशूट करायला येतात. पवनचक्कीजवळ सुंगर बाग आहे, जी पाहण्यासारखी असून समुद्रालगत आहे. येथील बैठक व्यवस्थाही अप्रतिम आहे. लाकडापासून बनवलेल्या टेबल खुर्च्यांवर बसून तुम्ही समुद्राकाठची संध्याकाळ न्याहाळू शकता.
देवगड किल्ला – देवगड हे हापूस आंब्यासाठी प्रसिध्द आहे. देवगडमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. किल्ला पाहताना पिण्याचे पाणी स्वत: घेऊन जावे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. देवगडपासून मालवण ५० किमी अंतरावर आहे. स्वत:चे वाहन असल्यास देवगड व विजयदुर्ग हे दोन्हीही किल्ले पाहता येतात. पुढे मालवणला मुक्काम करता येतो.
देवगड किल्ल्याला कसे जाल?
मुंबई व पुण्यावरून देवगड येथे जायला रेल्वे, एसटी उपलब्ध आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिट्ट्यावरून ४० किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. कणकवली येथे रेल्वेस्थानक आहे.
दर्शन बीच – हे फारसे कुणालाही माहिती नसलेले अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि नितळ पाण्याचा समुद्रकिनारा आहे. यास दर्शन बीच असंही म्हटलं जातं. देवगडच्या किल्ल्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर हे बीच आहे.