नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगाला एकत्र आणू शकतो. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष मिटवू शकतो, असा विश्वास फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत एकमेकांशी संवाद साधला. या बैठकीवेळी मॅक्रॉन बोलत होते.
भारतामध्ये जगाला एकत्र आणण्याची क्षमता आहे. इम्यॅन्युअल यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले. इम्यॅन्युअल म्हणाले- 'सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्ष मिटवण्यासाठी भारत मदत करू शकतो. आम्ही भारताच्या जी-२० अध्यक्षतेच्या यशासाठी काम करत आहोत. जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाच्या काळात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत अधिक उत्तम काम करण्याबाबत आशादायी असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
या बैठकीदरम्यान फ्रान्सच्या एअर बसकडून एअर इंडियाने २५० विमाने खरेदी करण्याची घोषणा केली.
युक्रेनमधील लष्करी कारवाईबद्दल भारताने रशियावर जाहीरपणे टीका केली नाही. गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान मोदी म्हणाले होते की, 'आजचा काळ युद्धाचा नाही.' या मताचे जगभरातील नेत्यांनी स्वागत केले होते. इतकेच नाही तर इंडोनेशियातील जी-२० च्या जाहिरनाम्यातही त्याचा उल्लेख आढळतो.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या कोणत्याही प्रयत्नांचे स्वागत करू असे अमेरिकेने म्हटले होते. याच्या काही दिवसांनंतर मॅक्रॉन यांनी आपले मत व्यक्त केले आहे.