पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनविरोधातील युद्ध रशिया काही दिवसांत जिंकेल असा सुरुवाताची अंदाज अनेकांचा होता. पण युक्रेनने बलाढ्य रशियाला कडवा विरोध केला आहे. काही महिन्यांपूर्वी युक्रेनने थेट मास्कोत ड्रोन हल्ले केल्यानंतर आता रशियाच्या ताब्यातील क्रिमियात युक्रेनच्या फौजा पोहोचल्या आहेत. युक्रेनचे आतापर्यंत या युद्धातील हे मोठे यश मानले जात आहे. (Ukraine troops in Crimea)
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे. "क्रिमियातील पश्चिम किनाऱ्यावर ओलेनिवका, मयाक या भागात आमचे सैन्य पोहोचले आहे. तिथे युक्रेनच्या फौजांचा शत्रू सैन्यासोबत चकमक झाली. यामध्ये शत्रूची मालमत्ता तसेच जीवितहानी झालेली आहे. क्रिमियात आम्ही आमचा राष्ट्रध्वजही फडकवला," असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. CNNने ही बातमी दिली आहे.
रशियाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. क्रिमिया हा युक्रेनचा द्विपकल्प आहे. २०१४ला रशियन फौजांनी क्रिमियावर ताबा मिळवला आहेत. (Ukraine troops in Crimea)
युक्रेनने यापूर्वी क्रिमियात ड्रोन हल्ले केले होते, त्यातून रशियाची वाहतूक व्यवस्था खिळखिळी करणे हा उद्देश होता, पण त्याला फारसे यश मिळाले नव्हते. क्रिमियात रशियाची हवाई संरक्षण यंत्रणा बळकट आहे, या ठिकाणी क्षेपणास्त्र आणि इतर आधुनिक व्यवस्थाही आहेत. युक्रेनने रशियाच्या एस ४०० ही क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचेही म्हटले आहे. क्रिमियातील मयाक हा परिसरात रशियाच्या रेडिओ इंजिनिअरिंग आणि रडारचे नियंत्रण कक्ष ही आहे.
रशियाच्या काही सोशल मीडिया अकाऊंटवर सकाळी ४च्या सुमारास गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. रशियातील लष्करी ब्लॉग असलेल्या Wargonzo ने युक्रेनच्या कारवाईला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा