मडगाव : पुढारी वृत्तसेवा; भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती (UK First Lady Akshata Murty), त्यांच्या दोन मुली आणि आई सुधा मूर्ती गोव्यात (Goa) सुट्टीचा आनंद घेत आहेत. या सर्वांनी नुकताच दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रकिनाऱ्यावर (Benaulim beach) पर्यटनाचा आनंद घेतला. दरम्यान, बाणावली येथे स्थानिक मच्छिमार पेले फर्नांडिस यांनी ब्रिटनच्या फर्स्ट लेडी अक्षता मूर्ती यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या गोव्यातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले.
पेले यांचा वॉटर स्पोर्ट्सचा व्यवसाय आहे. जेव्हा मूर्ती कुटुंबीय बाणावली समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद घेत होते त्यावेळी पेले याची त्यांचीशी भेट झाली. त्याने सर्वांना वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणार आहात का? अशी विचारणा केली. तेव्हा अक्षता मूर्ती यांनी प्रश्न केला की, 'गोव्यात वॉटर स्पोर्ट्स सुरक्षित आहे का? त्यावर त्यांनी म्हटले, मॅडम, १०० टक्के सुरक्षित आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा असल्यास तुमच्या सुऱक्षेची आम्ही काळजी घेऊ. पण त्या आमच्या स्पीड बोटीवर बसण्याआधी मी त्यांना सांगितले की ब्रिटनमध्ये अनेक गोमंतकीय राहतात आणि तेही तेथे सुरक्षित रहावेत अशी माझी इच्छा आहे. त्यावर त्यांनी ब्रिटनमधील गोमंतकीयांच्या सुरक्षेचे आम्ही काळजी घेऊ, असे उत्तर दिले.
याची माहिती पेले याने मंगळवारी माध्यमांकडे बोलताना दिली. अक्षता यांनी बोलताना सांगितले की त्यांचे खूप छान कुटुंब आहे, असेही पेले म्हणाला. "त्या खूप विनम्र आहेत. मला वाटते की भारतातील प्रत्येक राजकारण्याने त्यांच्याकडून हेच शिकले पाहिजे." असेही तो पुढे म्हणाला.
यावेळी अक्षता मूर्ती यांनी जेट स्कीवरून समुद्रात जलसफर केली. सुरुवातीला त्या थोड्या दचकल्याही; पण स्थानिक जलक्रीडा ऑपरेटरने त्यांना धीर दिल्यावर त्यांनी ही जलसफर पूर्ण केली. अक्षता मूर्ती या ताज एक्सोटिका या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत गोव्यात घालवलेल्या वेळाची काही क्षणचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यात त्या खूप आनंदित दिसत आहेत.
अक्षता यांचे (UK First Lady Akshata Murty) वडील एनआर नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहेत तर त्यांच्या आई सुधा मूर्ती शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांचे २००९ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना अनुष्का आणि कृष्णा या दोन मुली आहेत.
हे ही वाचा :