पुढारी ऑनलाइन डेस्क : Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांचा मुलगा आणि युवा कल्याण-खेळ विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी मोठे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली आहे. त्याच्या या वक्तव्यावरून वादविवाद सुरू झाला आहे. तर भाजपने निषेध करत तामिळनाडू भाजप प्रमुख अन्नामलाई यांनी स्टॅलिन कुटुंबावर पलटवार देखील केले आहे.
उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी शनिवारी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केल्याने आणि त्याला नुसता विरोध नको, तर 'निर्मूलन' केले पाहिजे, असे म्हटले आहे. 'सनातन निर्मूलन परिषदेत' बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.
उदयनिधी यावेळी म्हणाले, "काही गोष्टींना विरोध करता येत नाही, फक्त त्या संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. आपल्याला हे संपवायचे आहे. अशाप्रकारे सनातनला संपवायचे आहे, असे वृत्त एएनआयच्या हवाल्याने इंडिया टुडे ने दिले आहे.
"सनातनाला विरोध करण्यापेक्षा ते नष्ट केले पाहिजे. सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे. ते सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे," असे उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी म्हटले आहे.
उदयनिधी (Udhayanidhi Stalin) यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी लिहिले आहे की मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया-डेंग्यू सोबत केली आहे आणि त्याचा फक्त विरोध नाही तर त्याला संपवायला हवे असे म्हटले आहे. याचा अर्थ त्यांनी एक प्रकारे धर्माचे पालन करणाऱ्या भारताच्या 80 टक्के लोकसंख्येचा नरसंहार करण्याचे आवाहन केले आहे.
तामिळनाडू भाजप प्रमुख के अन्नामलाई यांनी म्हटले आहे की, राज्याच्या जीडीपीपेक्षा जास्त संपत्ती जमा करणे हा गोपालपुरम कुटुंबाचा एकमेव संकल्प आहे. ते पुढे म्हणाले की, उदयनिधी आणि त्यांच्या वडिलांच्या विचारांवर ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रभाव आहे. आपल्या दुर्भावनापूर्ण विचारसरणीला चालना देण्यासाठी अशा मूर्खांना विकसित करणे हे या मिशनऱ्यांचे काम आहे.
भाजप नेत्याला प्रत्युत्तर देताना, उदयनिधी स्टॅलिन यांनी X वर पोस्ट करत त्यात म्हटले आहे की, त्यांनी सनातन धर्माचे अनुयायी असलेल्या लोकांच्या "नरसंहार" साठी कधीही आवाहन केले नाही. ते म्हणाले की ते त्यांच्या शब्दांवर ठाम आहेत आणि सनातनी धर्मामुळे त्रस्त असलेल्या उपेक्षित समुदायांच्या वतीने मी बोललो आहे असे ते म्हणाले.
मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. अशा नेहमीच्या भगव्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आम्ही आमचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली पेरियार, अण्णा आणि कलैग्नार यांचे अनुयायी, सामाजिक न्याय टिकवून ठेवण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी कायम संघर्ष करू.
हे ही वाचा :