Uddhav Thackeray : प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करा

Uddhav Thackeray : प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रभू श्रीराम कुणा एका पक्षाची मालमत्ता नाही. मात्र, भाजपने प्रभू श्रीरामांवरून केलेला इव्हेंट बघता, प्रभू श्रीरामांना भाजपमुक्त करावे लागेल. यापुढे जय श्रीराम नाही तर भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. रामाचे मुखवटे घालून फिरणाऱ्या रावणांचे मुखवटे काढायचे आहेत, असे खेडबोलही त्यांनी याप्रसंगी सुनावले.

सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी येथे आयोजित शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, 'आज ते श्रीरामांचे नाव घेतात, मात्र त्यांच्यात श्रीरामांचा एक तरी गुण आहे काय? प्रभू रामचंद्र एकवचनी होते. मात्र, ज्या शिवसेनेने तुम्हाला अयोध्येपर्यंत पोहोचविले, त्या शिवसेनेचे वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे होऊ शकता? कोणीतरी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. मात्र, शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले नसते तर अयोध्येत राममंदिर उभे राहू शकले नसते. मोदी म्हणतात समर्थ भारत बनवायचा आहे. मग गेल्या १० वर्षांत तुम्ही काय केले याचा हिशोब द्या. पहिले पाच वर्षे जगभर फिरले. अलीकडे लक्षद्वीपवर गेले, मात्र अयोध्येत कधी गेले नव्हते. कालच्या इव्हेंटमुळे अयोध्येत गेले. आता 'राम की बात हो गयी, अब काम की बात करो' असे आवाहनही त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपला दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, 'माझ्या भगव्याशी, शिवसेनेशी प्रतारणा करणाऱ्या वालीचा राजकीय वध केल्याशिवाय राहणार नाही. मला वडिलोपार्जित शिवसैनिक मिळाले आहेत. चोरून मिळाले नाहीत. वर्षानुवर्षे शिवसेनेने खस्ता खाल्ल्या. मुंबईत जेव्हा दंगली पेटल्या तेव्हा शिवसैनिक हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर होता. आज त्याच शिवसैनिकांना भ्रष्टाचारी ठरविले जात आहे. शिवसैनिकांच्या जिवावर तुम्ही दिल्ली गाठली. आता आमच्यावर आरोप करता. गरिबांना सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेत तुम्ही आठ हजार कोटींचा घोटाळा केला. मात्र, त्याविषयी प्रश्न विचारायचे नाहीत. जे जिवावर उदार होऊन कोराेनात लढले, त्या माझ्या शिवसैनिकांवर आरोप केले जात आहेत. ईडीचा घरगड्याप्रमाणे वापर केला जातोय. स्वच्छ असाल तर अगोदर हिशोब द्या, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजन विचारे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, भास्कर जाधव, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, अनिल परब, सुनील प्रभू आदी नेते उपस्थित होते.

भाजपच्या जन्मकुंडलीत राहू-केतू

काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो. मात्र, भाजपसोबत ३० वर्षे राहून आम्ही त्यांच्यासारखे झालो नाही तर, काँग्रेसची साथ दिल्याने काय फरक पडणार, असा सवालही उपस्थित करीत, जनसंघाने मुस्लीम लीगसोबत पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केल्याच्या घटनेला उजाळा दिला. स्वातंत्र्यलढ्यात ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता ना जनसंघ. आयते मिळालेले स्वातंत्र्य हे गिळायला निघाले आहेत. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करायची होती, तेव्हा स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडणाऱ्या मुस्लीम लीगसोबत श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी ११ महिने ते मंत्रिमंडळात मंत्री होते. अशात तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. अगोदर तुमची जन्मकुंडली मांडा. तुमच्या कुंडलीत राहू-केतू आले असतील तर आम्ही काय करणार? असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

पीएम केअर खासगी कसे?

मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याच्या वल्गना केल्या जातात. मात्र, पीएम केअरबाबत विचारल्यास कोणीही बोलण्यास तयार नाही. ते खासगी असल्याचे सांगितले जाते. उद्या जेव्हा तुम्ही पंतप्रधान नसाल तेव्हा हा पैसा घरी घेऊन जाणार आहात काय? अगोदर याचा हिशोब द्या, नंतरच आमच्यावर आरोप करा, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

शिवनेरी मातीचा कलश जिल्हाप्रमुखांच्या हाती

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले म्हणून राममंदिर उभे राहिले. या मातीत तेज आहे. शिवजन्मभूमीची मूठभर माती घेऊन २०१८ मध्ये रामजन्भूमी अयोध्येत गेलो. त्यानंतर थंड बस्त्यात पडलेला विषय अचानक वर आला आणि सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबातचा निर्णय दिला. या मातीचा कलश शिवसेना (उबाठा) पक्षाच्या राज्यभरात जिल्हाप्रमुखांना या अधिवेशनादरम्यान सोपविण्यात आला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news