भारतीय शेअर बाजार आता जगातील चौथा सर्वात मोठा | पुढारी

भारतीय शेअर बाजार आता जगातील चौथा सर्वात मोठा

मुंबई; वृत्तसंस्था : गेल्या वर्षभरात चमकदार आणि लक्षवेधी कामगिरी करणार्‍या भारतीय शेअर बाजाराने जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार होण्याचा मान मिळवला आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत हा मान मिळवला. ‘ब्लूमबर्ग’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी भारतीय शेअर बाजारात असलेल्या समभागांचे एकूण मूल्य 4.33 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले, तर आतापर्यंत चौथ्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या शेअर बाजारात असलेल्या समभागांचे मूल्य 4.29 ट्रिलियन डॉलर होते.

‘ही’ आहेत प्रमुख कारणे

भारतीय शेअर बाजाराने 2023 मध्ये नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. त्याला कारणीभूत ठरला तो मोठ्या गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे वाढलेला ओढा. बाजाराची सध्याची परिस्थिती पाहता,
2024 मध्येदेखील भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरण्याची आशा आहे.

निर्देशांकाची झेप

2023 मध्ये भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवनवीन विक्रम केले. सेन्सेक्सने 18.8 टक्के, तर निफ्टीने 20 टक्के वधारत नवा टप्पा गाठला. गतवर्षी टाटा मोटर्सने 101 टक्के, बजाज ऑटोने 88 टक्के, एनटीपीसीने 87 टक्के, एल अँड टीने 69 टक्के, तर कोल इंडियाने 67 टक्के वाढ नोंदवली.

टॉप 5 शेअर बाजार (डॉलरमध्ये)

अमेरिका 50.86 ट्रिलियन
चीन 8.44 ट्रिलियन
जपान 6.36 ट्रिलियन
भारत 4.33 ट्रिलियन
हाँगकाँग 4.29 ट्रिलियन

Back to top button