पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका, युरोपमधील (Europe) आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांत नोकरकपात करण्यात आली आहे. आता अमेरिकेची कार निर्माता कंपनी फोर्ड (Ford) ३,८०० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. फोर्डने पुढील तीन वर्षांत युरोपमधील प्रोडक्ट डेव्हलमेंट आणि प्रशासनातील ३,८०० नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे, असे कंपनीकडून मंगळवारी सांगण्यात आले आहे. वाढत्या खर्चाचे कारण देत कंपनीने नोकरकपातीची घोषणा केली आहे.
जर्मनीच्या कोलोन आणि आचेन साइटवरील सुमारे २,३००, ब्रिटनमधील १,३०० जणांना आणि उर्वरित युरोपमधील २०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. व्हॉलंटरी प्रोग्रॅमच्या माध्यमातून कंपनीने नोकरकपातीची योजना आखली आहे.
याआधी जानेवारीच्या उत्तरार्धात युरोपमधील प्रोडक्ट डेव्हलमेंटमधील २,५०० नोकऱ्या आणि प्रशासनातील ७०० नोकऱ्या कमी केल्याचे सांगण्यात आले होते. आता मोठ्या संख्येने होत असलेल्या नोकरकपातीमुळे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे.
फोर्डने एका निवेदनात म्हटले आहे की, "युरोपमधील व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ही नोकरकपात आवश्यक होती." फोर्डने फेब्रुवारीच्या सुरुवातीस त्याच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर खर्चात कपात करण्याचे संकेत दिले होते. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जॉन लॉलर यांनी म्हटले आहे की उत्पादन आणि पुरवठा साखळी ऑपरेशन्समधील खर्च कमी करण्यासाठी ते कठोर निर्णय घेतील. युरोपमधील अभियंत्यांची प्रोडक्टिविटी अपेक्षेपेक्षा २५-३० टक्के कमी आहे.
फोर्ड या वर्षाच्या अखेरीस कोलोनमधील फोक्सवॅगनच्या MEB प्लॅटफॉर्मवर तयार केलेले युरोपमधील पहिले इलेक्ट्रिक वाहन लाँच करणार आहे आणि फोर्ड प्लॅटफॉर्म युरोपमध्ये आणण्याचा विचार करत आहे, असे युरोपियन पॅसेंजर इलेक्ट्रिक वाहन (EV) प्रमुख आणि फोर्ड जर्मनीचे प्रमुख मार्टिन सँडर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :