पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना केसेस झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. रविवारी (दि.४) चीनमध्ये १३ हजार १४६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. चीनमधील हा कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या दोन वर्षातील कोरोना लाटेमधील सर्वाधिक वाढीचा असल्याने पुन्हा एकदा जगाची डोकेदुखी वाढल्याचे दिसत आहे.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, यामधील १ हजार ४५५ कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आहेत, तर ११ हजार ६९१ लक्षणे नसलेली केसेस नोंदवल्या आहेत. तथापि, यामध्ये कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही."
चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे २५ दशलक्ष लोकांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून संसर्ग नियंत्रित करता येईल. शिपिंग दिग्गज मार्सकने शुक्रवारी सांगितले की, शहरातील काही डेपो बंद आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रकसेवा आणखी प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
2019 मध्ये पहिल्यांदाच चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आला होता. त्यानंतर या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होतो. त्यानंतर या साथीच्या रोगामुळे झालेल्या विध्वंसाची सर्वांनाच कल्पना आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन आपल्या शून्य कोविड धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे.