पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री धुळीचे वादळ आणि पावसाने मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एकूण २३ जण जखमी झाले. दिल्लीतील काही भागांमध्ये वादळामुळे इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांना झाडे उन्मळून पडण्याशी संबंधित १५२ कॉल्स आले. तर इमारतींचे नुकसान झाल्याशी संबंधित ५५ कॉल्स आले. तसेच वीज खंडित झाल्याबद्दल २०२ कॉल्स आले. काल रात्री दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात धुळीच्या वादळानंतर दिल्लीतील हवामानात बदल झाला.
येथील हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे दिल्ली विमानतळावरील एअर इंडियाच्या २ विमानांसह ९ उड्डाणे जयपूरकडे वळवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत प्रतिताशी ६०-७० किमी वेगाने वारे वाहिल्याने मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दिल्लीच्या हवामानात अचानक बदल झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील तापमानात वाढ झाली होती. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही अधिक होते. पण पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिल्लीत शनिवारी आणि रविवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हे ही वाचा :