यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : गणपती विसर्जन करून आल्यानंतर मूर्ती बुडाली की नाही हे बघण्यासाठी पुन्हा गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी ९ सप्टेंबरला सायंकाळी आर्णी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महागाव येथे घडली.
गोकुळ दत्ता टेटर (वय १७) आणि सोपान बबनराव गावंडे (वय 17) असे दोघेही रा. महागाव अशी बुडालेल्या मुलांची नाव आहेत. शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोघे आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते. गणपती विसर्जन करण्यात आले, त्यानंतर ते घरी परले. थोड्या वेळानंतर गणपती पाण्यात बुडाला की नाही, हे पाहण्यासाठी दोघे पुन्हा नाल्यावर गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे महागाव येथे शोककळा पसरली आहे.
नाल्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना तत्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी बराच वेळ त्यांच्याकडे बघितलेच नाही. तसेच ऑक्सिजनसुद्धा लावले नाही. डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे आमच्या मुलांचे जीव गेल्याचा आरोप मृतकाचे नातेवाईक करीत होते. त्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.