पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ९ भाविकांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत. शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. तर दुसऱ्या अपघात हा सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ वारकरी घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव मालट्रकने ठोकरल्याने झाला. हे दोन्ही अपघात रविवारी ( दि.१३) रोजी मध्यरात्री आणि सोमवारी (दि. १४) सकाळच्या दरम्यान घडले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शेगाव येथे श्री. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवर देऊळगाव राजा नजीक बोलेरो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ५ भाविक ठार तर ४ जखमी झाले. जखमीवर देऊळगाव राजा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि.१४) रोजी सकाळी ६ वाजता घडली. मृतकांमध्ये बोलेरो चालक, १ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर देऊळगाव राजा व जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तर दुसऱ्या एका अपघातात पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ वारकरी घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव मालट्रकने ठोकरल्याने दुसरा अपघात घडला. या अपघातात ४ वारकरी ठार, तर १७ जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.१३) रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली आहे. सर्व जण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरनजीकच्या कदमवाडी गावचे रहिवासी आहेत.
सोमवारी एकादशी आहे. त्यानिमित्त कदमवाडीचे सर्व वारकरी हे ट्रॅक्टरने रात्री जेवण करून विठ्ठल दर्शनासाठी उशीरा पंढरपूरला निघाले होते. हे सर्वजण कोंडीनजीक राहुटी येथे पोहोचले होते. यावेळी पुण्याला सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. त्यामुळे ट्रकने ट्रॅक्टरला मागच्या बाजूने सुमारे दीडशे फूट फरफटत नेले. त्यात ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या.
अपघात एवढा भीषण होता की, डिव्हायडर फूटून ट्रॅक्टरमधील वारकर्यांना ट्रकने अक्षरश: चिरडले. यामध्ये ४ वारकरी जागीच ठार झाले तर १७ जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच गावकरी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरील दोन्ही अपघातात मिळून ९ भाविकांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.
हेही वाचलंत का?