सदाभाऊ खोत म्हणाले, ॲड. सदावर्ते राक्षस, पलटवार करत सदावर्ते म्हणाले सदाभाऊ वयोवृद्ध नेते

सदाभाऊ खोत म्हणाले, ॲड. सदावर्ते राक्षस, पलटवार करत सदावर्ते म्हणाले सदाभाऊ वयोवृद्ध नेते
Published on
Updated on

एसटी कामगारांच्या संपाच्या १३ व्या दिवशी कामगारांचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत आणि कामगारांसाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शाब्दिक खडाजंगी उडाल्याची माहिती आहे. यासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार खोत यांनी राक्षस म्हणून संबोधल्याने अॅड. सदावर्ते यांनी खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, या व्हिडिओनंतर कामगारही आंदोलनाच्या नेतृत्त्वावरून द्विधामनस्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

अॅड. सदावर्ते यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सदाभाऊ खोत यांनी राक्षस म्हणून संबोधल्याने आपण व्यथित झाल्याचे ते सांगताना दिसत आहेत. याशिवाय न्यायालयाला आपण वचन दिलेले असून सरकारचे किंवा प्रशासनाचे श्राद्ध किंवा तेरावा घालणे, साडी-चोळी भेट देणे अशा एसटी कामगारांच्या आंदोलनांविरोधात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सदाभाऊ खोत हे वयोवृद्ध नेते असल्याने अधिक महत्त्व देत नाही

याबाबत अॅड. सदावर्ते यांच्याशी बातचीत केली असता, एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी आपला उल्लेख राक्षस म्हणून केल्याचे सांगितले. सदाभाऊ खोत हे वयोवृद्ध नेते असल्याने त्यांना अधिक महत्त्व देत नसल्याची प्रतिक्रिया सदावर्ते यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, कष्टकरी कामगारांचे नेते असल्याने त्यांच्याविरोधात अधिक काही बोलणार नाही. श्राद्ध किंवा तेरावे घालण्याचा प्रकार म्हणजे एसटी कामगारांना कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन करत आहे. यासंदर्भात कामगारांना समज दिली असून यापुढे असे होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी सोमवारी आझाद मैदानात सरकारचे तेरावे घातले असून यापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारीच परिवहन मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर भेट देण्याचे आंदोलन केले होते. त्याआधी भाजपा नेते व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विलिनीकरण एका दिवसात शक्य नसल्याने सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन केल्याचे समोर आले होते. भाजपाच्या सर्वच नेत्यांची हजेरी सदावर्ते यांनी या व्हायरल व्हिडिओमध्ये घेतली आहे. कामगारांसमोर सदावर्ते यांनी सुवर्णमध्य की विलिनीकरण? असा प्रश्न उपस्थित केल्याचे या व्हीडियोत दिसते. त्यांच्या प्रश्नावर कामगारांनी विलिनीकरणावर ठाम राहण्याचे उत्तर दिले आहे. निकाल आपल्याबाजूने हवा असल्यास राजकीय स्टंटबाजी नको, असा सज्जड दम या व्हिडिओत सदावर्तेंनी कामगारांना दिला आहे. परिणामी, भाजपा आमदारांविरोधात अॅड. सदावर्ते असा वाद आता जन्माला आल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते.

सदावर्ते यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एसटीतील महिला कामगाराने आंदोलनात राजकीय हस्तक्षेप नको असल्याचे म्हटले आहे. त्या महिलेच्या वक्तव्यानुसार, ही न्यायालयीन लढाई असून कामगारांचे नेतृत्त्व कामगार नेते अजयकुमार गुजर आणि अॅड. सदावर्ते करतील. याउलट आमदार खोत आणि पडळकर यांचे आंदोलनात स्वागत आहे, मात्र आमची लढाई न्यायालयीन आहे, असे कामगारांनी त्यांना सांगायचे आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या किती ऐकायचे ? हे कामगारांनी ठरवायचे आहे, असेही ती महिला कामगार व्हिडिओत बोलताना दिसते. एकूणच नेत्यांमधील शाब्दिक खडाजंगीमुळे कामगारांमध्येही नेतृत्त्वावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागल्याचे स्पष्ट होते.

कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : आ. गोपिचंद पडळकर

या व्हिडिओबाबत आमदार पडळकर यांना विचारले असता, आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच कामगारांमध्ये शासनाला फूट पाडता आलेली नसल्याने ते आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही पडळकर म्हणाले. आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news