पुढारी ऑनलाईन: तुर्कीतील महाभयंकर भूकंपाला १२ दिवस, २९६ तास होऊन गेले. तुर्कीतील शक्तीशाली, महाभयंकर भूकंपामुळे शेजारील देश सीरिया देखील हादरला आहे. या भूकंपामुळे आत्तापर्यंत ४६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये विध्वंसाच्या चित्रांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. दरम्यान बचावकार्य अद्याप सुरूच आहे.
दक्षिण तुर्कीत १२ दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत ४६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तुर्कीत सर्वाधिक ४०,४०२ लोकांचा, तर शेजारच्या सीरियामध्ये ५८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २९६ तासांच्या मदत आणि बचाव कार्यानंतर आता जीव वाचण्याची आशा फार कमी आहे. तसेच अशा स्थितीत आज (रविवार) रात्रीपासून बचावकार्य थांबण्याची शक्यता असल्याचेही आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले आहे.
बचावकार्य बंद झाल्यानंतर ढिगारा त्वरीत हटवला जाईल. यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह समोर येऊ शकतात, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये सुमारे तीन लाख घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक महत्त्वाची शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.
दक्षिण तुर्कीचे कहरामनमारा शहर हे भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. येथील स्मशानभूमीत हजारो नवीन कबरी वाढल्या आहेत. दुसरीकडे, तुर्कस्तानचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी म्हटले आहे की, भूकंपग्रस्त भागात आतड्यांसंबंधी आणि श्वसन संक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.