मोदींच्या दौऱ्यासाठी ‘संकटमोचक’ नाशिकमध्ये तळ ठोकून

गिरीश महाजन
गिरीश महाजन
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी(दि. १२) होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद‌्घाटनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेल्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावरच मोदींचा रोड शो आणि जाहीर सभेचे नियोजन असल्याने त्यांनी नाशकात तळ ठोकला आहे. भाजपच्या नेत्यांसह प्रधानमंत्री कार्यालयाशी समन्वयाची मोठी जबाबदारी महाजन यांच्या खांद्यावरच असल्याने मोदींचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी महाजन यांनी कंबर कसली आहे.

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिकमध्ये होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानाच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमीत पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेतून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल वाजविला जाणार आहे. भाजपच्या प्रचाराची सुरुवात या माध्यमातून केली जाणार असल्याचे भाजपच्या अंतर्गत सूत्रांची माहिती आहे. मोदींसमवेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक मंत्री या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या जाहीर सभेपूर्वी सकाळी ११.३० वाजता छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिर्ची ते तपोवनातील सभास्थळापर्यंत मोदींचा रोड शो देखील होणार आहे. या सभेची तसेच रोड शोच्या तयारीची धुरा भाजपने महाजन यांच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यामुळे महाजन यांनी मंगळवारपासूनच नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. शासकीय यंत्रणांकडून मोदींच्या या दौऱ्याच्या तयारीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

भाजपचे शक्तिप्रदर्शन

कार्यक्रमाला आता जेमतेम एकच दिवस शिल्लक असल्यामुळे महाजन यांनी एकाच वेळी पक्षाची यंत्रणा तसेच शासकीय यंत्रणा या कार्यक्रमासाठी लावली आहे. मोदींच्या सभेसाठी हजारो लोकांना जमविण्याचे नियोजन करण्यात येत असून, रोड शोदेखील भव्यदिव्य केला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून शक्तिप्रदर्शनच केले जाणार आहे. मोदींच्या या दौऱ्यासाठी महाजन यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news