नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना सोडलेल्या गद्दारांचा मुखवटा आता फाटलेला आहे. त्यांना दसरा मेळाव्याचे निमित्त पाहिजे होते; पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेनेचाच राहणार आहे. कारण माझ्या शिवसंवाद यात्रांना महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गद्दार बिथरलेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना केली.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेनेचाच राहणार आहे. आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करीत आहोत. आम्ही अर्ज देणार आहोत. पण हे सरकार आमचा अर्ज स्वीकारायला तयार नाही. हे सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मूळ शिवसेना कोणाची आहे हे सर्वांनाच माहिती आहे. शिवसेनेत खरी आणि खोटी असे काही नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले आहे. जनता यापूर्वीही आमच्या सोबत होती. आणि यापुढेही आमच्या सोबतच राहिल, असा विश्नासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेने कुठेही भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका नेहमी कायम आणि स्पष्ट राहिलेली आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच आमची भूमिका आहे. आमची मते आणि भूमिका ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील. महाविकास आघाडी सरकारमध्येही आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी एकत्र आलो आणि सोबत राहिलो, असेही ते म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर आंदोलने केली. यापूर्वी कधी सत्ताधाऱ्यांना असे पायऱ्यांवर उभे पाहिले आहे काय? असा सवाल करत या सरकारच्या मागे कोणी नाही असे स्पष्ट दिसून येते.जनता शिवसेनेसोबत आहे. आम्ही काय कमी केले? म्हणून यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
हेही वाचा