Time New Moon : वेळ अमावस्‍या विशेष : ओलगे-ओलगे सालम पोलगे घोषणेने शिवारं गच्च अन् गावे हाेणार निर्मनुष्‍य

वेळ अमावस्या
वेळ अमावस्या
Published on
Updated on

लातूर ; शहाजी पवार : Time New Moon : जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली वेळ अमावस्या आज (शुक्रवार) उत्साहात साजरी होणार असून, गावे निर्मनुष्य तर शिवारे माणसांनी गच्च होणार आहेत. ओलगे ओलगे सालम पोलगे या घोषाने शिवार गुंजणार आहे.

Time New Moon : काय आहे वेळ अमावस्या? 

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह कर्नाटकातील सीमावर्ती भागात हा सण साजरा केला जातो. शिवारपूजा, वेळ अमावस्या, येळमाशी, येळवस अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो. या सणाचे लिखित संदर्भ उपलब्ध नसले, तरी सृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा केला जातो, असे शेतकरी सांगतात. या दिवशी गावे निर्मनुष्य होतात. तर शिवारं माणसांनी फुलून जातात.

व्यवसाय व नोकरीनिमित्त शहरात गेलेली मंडळी या सणासाठी सहकुटूंब गावी परततात. गाव शहरात जणू अघोषित संचारबंदी लागल्याचा अनुभव या दिवशी नक्की येतो. शेतकरी भल्या सकाळी शेतावर जाऊन काळ्या मातीतून दोन लक्ष्मी साकारतो. तत्पूर्वी त्यांच्या स्थापनेसाठी ज्वारीच्या कडब्याची खोप बनवतो. (घर) त्यातील रानात सडा शिंपून लक्ष्मी स्थापनेसाठी मातीच्या चिखलातून सिंहासन साकारतो. त्याला पानाफुलांनी सजवतो व त्यात लक्ष्म्यांची प्रतिष्ठापना करतो.

त्यानंतर त्याची सपत्नीक पूजा करुन सर्वांच्या कुशलमंगलाची अन् धनधान्य संपन्नतेची तिच्याकडे प्रार्थना करतो. ग्रामदेवता व पांडवांसह शिवारातील देवदेवतांची पूजा करुन मानाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर पंगती रंगतात. गावगाड्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बारा बलुतेदारांना या दिवशी मानाच्या जेवणाचे आमंत्रण दिले जाते. सायंकाळी काळ्या रानात एका मडक्यात दूध ऊतू येवून सांडेपर्यंत तापवले जाते. ते ज्या दिशेला सांडेल त्या दिशेला पीक अधिक पिकते, असे शेतकरी मानतात. रात्रीच्या वेळी तिळाच्या पेंढ्या पेटवून (हेंडगे) त्या हातात घेवून शेतकरी शेताच्या बांधावरुन फेरी मारतात. त्यामुळे थंडी जाते, असा समज आहे.

भज्जी मानाचा मेनू 

या सणानिमित्त विविध पदार्थ बनवले जातात. त्यात डाळीच्या पिठात विविध भाज्यांची मिसळ करुन तयार केलेली भज्जी हा मानाचा पदार्थ असतो. भज्जीसाठी हिरवी मटार, हरभरा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगातील हिरवे दाणे, काकडी किंवा वाळूक, वांगी, मेथीचा पाला, कोथिंबीर, कांदापात, लसुणपात, आले, शेंगदाणे, हिरवी चिंच, गाजराचा वापर केला जातो. ज्वारी भरड्याचा आंबड भात, तांदळाची खीर, भात, ज्वारी अन् बाजरीचे उंडे, ज्वारी, बाजारीची भाकरी, तुरीचे फिके वरण या शिवाय बरेच जण धपाटे, तिळाच्या पोळ्याही करतात.

Time New Moon : झणझणीत आंबील 

या सणाचा दुसरा मानाचा मेनू म्हणजे झणझणीत आंबील. चार-पाच दिवसांच्या आंबट दह्याचे ताक केले जाते. त्यात थोडेचे ज्वारी पीठ शिजवून टाकले जाते. मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, आले, लसणाचे वाटण अन् मिरची पावडर त्यात कच्चेच टाकतात. ती नव्या मडक्यात ठेवतात. तत्पूर्वी मडके काव-चुन्याने रंगवले जाते. आंबिलीची मज्जा अन् त्यामुळे येणारी जराशी गुंगी काही औरच असते.

Time New Moon : पांडव पूजन 

शेतीचे रक्षण करतात म्हणून पांडवाचे पूजन या दिवशी केले जाते. यात सात दगड चुन्याने रंगवतात व पुजतात. त्यातील पाच पांडव असतात तर उर्वरीत दोनमधील एक द्रौपदी तर एक माता कुंती असते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news